महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असताना उमेदवार मात्र प्रचंड टेन्शनमध्ये आले आहेत. युती आघाडी होण्यासंदर्भात अखेरच्या क्षणापर्यंत संभ्रम, पक्षांतर करण्यासाठीची धावाधाव आणि तिकीट मिळवण्यासाठी रस्सीखेच… अशा वातावरणामध्ये अर्ज मागे घेण्याच्या अगदी अखेरच्या क्षणापर्यंत सर्वच महापालिका क्षेत्रांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण राहणार आहे.
परिणामी, उमेदवारांना प्रचारासाठी जेमतेम १२ दिवसांचा अवधी मिळणार आहे. म्हणूनच, सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवारांना प्रचारातील प्रत्येक दिवस हा टी २० क्रिकेट सामन्यातील पॉवर प्ले मधील फटकेबाजी सारखाच खेळावा लागणार आहे!
दुसरीकडे, विरोधी पक्षांमध्ये देखील स्वतंत्र लढायचे किंवा आघाडी करायची याबाबत कोणतीही एका वाक्यता किंवा सूत्र ठरलेले नाही. अशा परिस्थितीमध्ये आगामी महापालिका निवडणुकीत विजयाचे लक्ष दूरच, पण किमान निवडणुकीला सामोरे कसे जायचे, याचेच मोठे आव्हान विरोधकांपुढे उभे ठाकले आहे.
महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठीचा कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार, २३ ते ३० डिसेंबर दरम्यान अर्ज भरायचे आहेत. २ जानेवारी ही माघारीची अखेरची तारीख आहे. १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला निकाल लागणार आहे. म्हणजेच प्रचारासाठी जेमतेम १२ दिवसांचा कालावधी मिळणार आहे.
भाजप व्यतिरिक्त इतर पक्ष खिंडीत?
गेल्या काही महिन्यांमध्ये पक्षामध्ये इन्कमिंगचा जोरदार तडाखा लावून भारतीय जनता पक्षाने सर्व महापालिका क्षेत्रांमध्ये स्वतंत्रपणे लढण्यासाठीची आपली तयारी पूर्ण केली आहे. त्याच वेळेस आपल्या सहकारी पक्षांना, म्हणजेच शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी अजित दादा पवार या गटांना कोणतेही थेट आश्वासन न देता झुलवत ठेवले आहे. महायुती करायची असे एकीकडे म्हणताना दुसरीकडे महायुतीला सुरूंग लावणाऱ्या अनेक मुत्सद्दी चाली भारतीय जनता पक्षाने खेळल्या आहेत. ठाणे जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने केलेले इनकमिंग हे त्यापैकीच एक. अशा परिस्थितीत टी २० सामन्याप्रमाणे अतिशय मोजकेच दिवस हातामध्ये देऊन भारतीय जनता पक्षाने आपल्याच महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना खिंडीत गाठले आहे, असे निरीक्षण राजकीय वर्तुळातून नोंदवण्यात येत आहे.
शिवसेना एकनाथ शिंदे गटाने भारतीय जनता पक्षावरील दबाव कायम राखत प्रत्येक महापालिका क्षेत्रामध्ये भाजप खालोखाल सर्वाधिक जागा पटकावण्यासाठी आपले वाटाघाटीचे धोरण रेटून ठेवले आहे. त्या तुलनेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला फारशी संधी मिळालेली नाही. त्यामुळेच, पुणे पिंपरी चिंचवड असे पक्षाचे सर्वेसर्वा अजित दादा पवार यांचे बालेकिल्ले आपल्या तावडीतून सुटू नये यासाठीच राष्ट्रवादीने सर्व शक्तीपणाला लावल्याचे समजते. हातचे हातचे सोडून पळत्याच्या मागे धावण्याची गरज नाही, असा सूर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातून उमटला असल्याचे समजते.
महाविकास आघाडी कोणत्या महापालिका क्षेत्रांमध्ये होणार आणि कुठे नाही यासंदर्भात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि यांच्यामध्ये कोणतीही एकवाक्यता नाही. दुसरीकडे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची निवडणुकीसाठीची युती जाहीर होणार का? जाहीर होणार असल्यास ती कधी होणार? या प्रश्नांची देखील अजून कोणतीही ठोस उत्तरे नाहीत! अशा परिस्थितीमध्ये आगामी महापालिका निवडणुकीत विजयाचे लक्ष दूरच, पण किमान निवडणुकीला सामोरे कसे जायचे, याचेच मोठे आव्हान विरोधकांपुढे उभे ठाकले आहे.

