भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे आरोप सहन करावे लागत असतानाच अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी महापालिका निवडणुकीत काहीसा एकाकी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये आगामी महापालिका निवडणुकीसाठी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुण्यासह नाशिक आणि नागपूरमध्ये देखील युती केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच, अधिकृतपणे काडीमोड घेण्यात आला नसला तरी महायुतीमधून अजितदादा यांना विभक्त ठेवले जाणार आहे हे आता स्पष्ट झाले आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार यांचे महायुती सरकार स्थापन झाले. त्यानंतरच्या एक वर्षांमध्ये अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांवर सर्वाधिक आरोप झाले आहेत. बीड मधील मस्साजोग हत्याकांडानंतर धनंजय मुंडे यांना विजनवासात जावे लागले, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळातील रमीचा डाव महायुती सरकारला महागात पडला. त्यानंतर आता खुद्द अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित जमीन व्यवहारावरून आरोपयुद्ध भडकले आहे.
जनताभिमुख सरकार चालवतानाच भ्रष्टाचाराचे किंवा गैरव्यवहाराचे कोणतेही आरोप होऊ नयेत, यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना महायुतीतील सर्व घटक पक्षांना वेळोवेळी देण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे आपल्या सार्वजनिक आणि खाजगी व्यवहारामुळे महायुती कोणत्याही टप्प्यावर अडचणीत येऊ नये, याची देखील दक्षता घ्यावी असे सांगण्यात आले होते. मात्र या दोन्ही निकषांवर अजितदादा यांची राष्ट्रवादी सपशेल अपयशी ठरली आहे. त्यामुळेच वेळोवेळी महाराष्ट्रातील जनमानसामध्ये महायुती सरकारची प्रतिमा मलिन होण्याचे धोके निर्माण झाले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर या सर्व आरोपांपासून आपली सुटका करून घेण्यासाठी महायुतीमध्ये अजितदादा यांच्या राष्ट्रवादी पक्षाला सहभागीच करून घेण्यात येणार नाही. आणि हीच रणनीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या बैठकांमध्ये स्पष्ट झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
आता या पार्श्वभूमीवर अजितदादा यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कशा पद्धतीने प्रत्युत्तर देतो आणि आगामी महापालिका निवडणुकांमध्ये जनतेला कसा सामोरे जातो, याबाबत निर्णय घेताना अजित पवार यांच्या राजकीय रणनीतीचा कस लागणार आहे.





