उपमुख्यमंत्री अजित दादांच्या माघारीच्या प्रयत्नांना अपयश
महापालिकेच्या सूस-बाणेर- पाषाण या प्रभागाच्या निवडणुकीच्या रिंगणात तगडे अपक्ष उमेदवार प्रमोद निम्हण व पूनम विधाते यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने राष्ट्रवादी कॅाग्रेस व भाजपचे उमेदवार धास्तावले आहेत.

या दोन्ही उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या आटोकाट प्रयत्नांना अपयश आले. या दोघांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादी कॅांग्रेसचे चारही उमेदवार अत्यंत अडचणीत आले आहेत. येनकेन प्रकारे या दोन्ही उमेदवारांची माघार व्हावी यासाठी दबावतंत्रही वापरले गेले. मात्र त्याला न जुमानता या दोघांनी उमेदवारी कायम ठेवली.
भाजपने तिकीट नाकारलेल्या अमोल बालवडकर यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीत (अजित पवार गट) प्रवेश केला. बालवडकर यांना उमेदवारी दिल्यावर या प्रभागाची राजकीय गणिते मांडताना पवार यांची दमछाक झाली. गेली १८ वर्षे राष्ट्रवादीसोबत राहिलेल्या प्रमोद निम्हण यांना पवार यांनी गळ घालून महिलेची उमेदवारी घेण्याची विनंती केली. परंतु निम्हण यांनी त्यास नम्रपणे नकार दिला. त्यामुळे पवार यांनी निम्हण यांचे तिकीट नाकारून बाबूराव चांदेरे यांना उमेदवारी दिली. तसेच तिकीटासाठी प्रबळ दावेदार असलेल्या पूनम विधाते यांना चांदेरे यांच्या हट्टाखातर नाकारण्यात आले.
परिणामी, निम्हण व विधाते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आणि राष्ट्रवादी व भाजपसमोर तगडे आव्हान उभे केले. निम्हण व विधाते यांची उमेदवारी अमोल बालवडकर व चांदेरे यांना धोकादायक ठरणार असल्याचे चित्र दिसल्याने अजित पवार यांनी त्यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी प्रयत्न केले. पण ते फोल ठरले.
या प्रभागात आता कडवी झुंज होणार असून बाबूराव चांदेरे यांचे सीट धोक्यात आले आहे. तसेच बालवडकर यांनाही धोका निर्माण झाला असून भाजपचे अ गटातील उमेदवार लहू बालवडकर यांना त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. विधाते यांची ताकद व संपर्क मोठा असल्याने महिला गटातही कडवी लढत पहायला मिळेल.



