प्रभाग क्र. ९ मध्ये नक्की विकास की भकास?
नागरिकांचा प्रश्न
बाणेर बालेवाडी भागात वाहतुकीच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. अनधिकृत पथारी व्यावसायिक आणि दुकानदारांमुळे रस्ते छोटे झाले आहेत. त्यामुळे त्या भागातील अनेक रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असते. या व्यावसायिकांवर स्थानिक नेत्यांचा वरद हस्त आहे. हा विकास म्हणायचा की भकास म्हणायचं असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
बाणेर – बालेवाडी परिसराची लोकसंख्या वाढत आहे. त्यादृष्टीने लोकप्रतिनिधींकडून काहीच ठोस उपाय योजना केल्या जात नसल्याने या परिसराचे बकालीकरण वाढले आहे. गेल्या काही वर्षात परिसरात कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. पदपथांवर व्यावसायिकांनी कब्जा केल्याने नागरिकांना चालणे अवघड झाले आहे. तर अनधिकृत व्यवसायिकांकडून लोकप्रतिनिधींची पिल्लावळ महिना तीन हजार रुपये हप्ता घेत असल्याचे समोर आले होते. या प्रकारातून वाद झाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला होता. तर बाणेर परिसरात लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने चौपाटी पेव फुटले आहे.

सोसायट्यांमधील पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. एका लोकप्रतिनिधीने बांधकाम व्यावसायिकांवर कोर्टात केस दाखल केली होती. परंतु बांधकाम व्यावसायिकांनी सक्षम बाजू मांडल्याने केस टिकली नाही. अखेरीस तडजोड करत माघार घेण्यात आली. बाणेर रस्त्यावर असणाऱ्या हॉटेल संस्कृतीला रहिवास्यांना त्रास होत असल्याने विरोध सुरु होता. परंतु त्याप्रश्नावर योग्य तोडगा निघाला नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींवर नागरिक नाराज आहेत. त्यामुळे आता बदल हवा अशी नागरिकांची इच्छा आहे. बाणेर – बालवाडीच्या प्रश्नावर आवाज उठवण्याचा नारा देण्याचे ढोंग करणाऱ्या लोकप्रतिनिधींना प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिक सवाल करीत आहेत.



