, ,

कुणी गणेश नाईक घ्या, तर कोणी धंगेकर घ्या! 

Author Picture
By Office Onlyforpolitics Published On: October 24, 2025

महायुतीमधील मित्र पक्षांकडून एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी व्यक्तिगत आरोप प्रत्यारोपांच्या ड्रोनचा मारा

भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्या एकत्रीकरणातून तयार झालेली महायुती अभेद्य असल्याची वक्तव्य वेळोवेळी करण्यात येत आहेत. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समीप येत असताना एकमेकांच्या बालेकिल्ल्यांना खिंडार पाडण्यासाठी महायुतीमधील मित्रपक्ष कुरघोडीचे डाव प्रतिडाव खेळत आहेत. त्यासाठीच महायुतीमधील मित्र पक्षांकडून एकमेकांवर व्यक्तिगत आरोप प्रत्यारोपांच्या ड्रोनचा मारा करण्यात येत आहे.

अर्थात आपापल्या पक्षांमधील मुलुखमैदान तोफांचा कूटनीतीसाठी वापर करण्याची परंपरा महाराष्ट्रातील राजकारणात तशी नवीन नाही. अगदी अलीकडच्या काळातीलच उदाहरण द्यायचे झाले तर, भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना यांच्यातील भ्रष्टाचाराच्या फायलींवर फायली सादर केल्या होत्या. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात आले. फडणवीस, शिंदे, अजित दादा यांची महायुती सत्तेत बसविण्यात आली. तसे, सोमय्या यांना आता शिताफीने साईड ट्रॅक करण्यात आले. त्यांच्या आरोपांमध्ये खलनायक असलेले राष्ट्रवादी शिवसेनेचे नेते मंडळी आता सोमय्या यांच्यात भारतीय जनता पक्षासमवेत महायुतीत मंत्रिपदावर आहेत.

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट या दोघांनाही आता मुंबई महापालिकेत सत्तेत येण्याचे वेध लागले आहेत. महायुतीच्या माध्यमातून राज्यातील सत्ता काबीज केली असली तरी आपले हे मित्रपक्ष मुंबई महापालिका हस्तगत करण्याच्या मोहिमेत अनेक ठिकाणी अडथळा ठरू शकतात, ही वस्तुस्थिती कार्यकर्ते उघडपणे बोलत आहेत. त्यातच राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून देखील पुणे पिंपरी चिंचवड मध्ये आपणच दादा असल्याचे सिद्ध करण्यासाठी मोर्चेबांधणीला प्रारंभ करण्यात आला आहे. त्यांच्यासाठी ही मिशन गुलाबी नसून त्यामध्ये भाजप आणि शिंदे सेना या दोघांचा अडसर ठरण्याचा धोका असल्याचे सांगितले जात आहे.

या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी आपल्याच मित्र पक्षाची प्रतिमा डागाळण्याची कारस्थाने केली जात असल्याचे दिसत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून कधी जनता दरबाराच्या माध्यमातून तर कधी कार्यकर्ता मेळावा आणि जाहीर कार्यक्रमांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे मंत्री गणेश नाईक हे ठाण्यामध्ये शिंदे सेनेला सातत्याने डिवचत आहेत. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या संदर्भात तक्रारी देखील करून झाल्या. मात्र त्यांनी नेहमीप्रमाणेच स्मितहास्य करून बोळवण केल्याने शिंदे सेनेमध्ये ठाणे आणि उपनगर परिसरात प्रचंड अस्वस्थता आहे.

म्हणूनच की काय शिंदेसेनेकडून आपल्या भात्यामध्ये नव्यानेच समाविष्ट करण्यात आलेले ड्रोन म्हणजेच रवींद्र धंगेकर हे पुण्यामध्ये ॲक्टिव्ह केले. खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर जैन होस्टेल विक्री कराराच्या निमित्ताने आरोपांची तोफ टाकण्यात आली. तुमचे गणेश नाईक तर आमचे रवींद्र धंगेकर असा हा आता भारतीय जनता पक्ष विरुद्ध शिवसेना शिंदे गट यांच्यातील आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगतो आहे.

अर्थात, या दोघांच्या शब्दबाणांमध्ये करण्यात आलेले आरोप आणि मुख्य विषय, त्या मागील प्रकरणे, त्यांची पार्श्वभूमी, या सर्वांची सत्यता आणि त्याचे गंभीर्य याकडे मात्र महायुतीतील सर्वच घटक पक्षांकडून सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जात आहे!

महायुतीच्या सुदैवाने सध्या विरोधक अत्यंत दुबळे झाले आहेत. तसेच मतदारांचा महायुतीवर असलेला कथित विश्वास अजूनही अबाधित आहे. त्यामुळेच या आरोपांच्या फेरीचा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकालाला किती फटका बसू शकेल याबाबत मात्र साशंकता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी Youtube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Discover more from Only For Politics

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading