सकाळी तीन; तर सायंकाळी चार तास जड वाहतुकीला मनाई
पुणे : वाहतुकीची सतत होणारी कोंडी सोडविण्यासाठी पुणे-बंगलोर बाह्यवळण मार्गावरील कात्रज ते किवळे दरम्यान अवजड वाहतुकीला निर्बंध घालण्यात आले आहेत.
हे निर्बंध सकाळी तीन तास व सायंकाळी चार तासापर्यंत असणार आहेत. या काळात अवजड वाहनांना कात्रज ते किवळे दरम्यान वाहतूक करण्यास मनाई करणारा आदेश वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी काढला आहे.
हिंजवडीतील आयटी हबमुळे या भागातील नागरिकरण वाढले आहे. उद्योगांबरोबर इतर व्यवसाय वाढल्याने कामगारांची संख्याही वाढली आहे. लाखो कामगार आपल्या वाहनांसह या रस्त्यावरून ये-जा करतात. त्यातच मुंबई, ठाणे, रायगडहून बंगलोरला जाणारी जड अवजड वाहने तसेच सातारा, कोल्हापूरहून मुंबईचा दिशेने जाणारी वाहने याच रस्त्याचा अवलंब करतात. पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने कात्रज ते किवळे या दरम्यान सकाळी व सायकाळी मोठी वाहतूक कोंडी होते. त्यावर उपाय म्हणून कात्रज ते किवळे व किवळे ते कात्रज दरम्यान मल्टी ॲक्सल ट्रेलर्स, कंन्टेनर्स, ट्रॅक्टर, रोड रोलर, जेसीबी अशा वाहनांना सकाळी ८ ते ११ व सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने या निर्बंधातून वगळण्यात आली आहेत. १५ ॲाक्टोबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
कात्रज ते किवळे दरम्यान अवजड वाहनांना निर्धारित वेळेत वाहतुकीस मनाई
– सातारा रस्त्यावरून येणारी वाहने शिंदेवाडी येथे थांबवणार
– मुंबईहून येणारी वाहने उर्से टोल नाका व वडगावफाटा येथे थांबविली जाणार
– १५ ॲाक्टोबरपासून निर्णयाची अंमलबजावणी
– बाह्यवळण मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार



