– पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थांचे सहकारी फेडरेशनची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
– सर्वोत्तम पतसंस्थांना स्वर्गीय आमदार शिवाजीराव भोसले आदर्श पतसंस्था पुरस्कार
पुणे : ‘सहकार हा लोकशाहीचा आत्मा असून, सहकार चळवळीने सर्वसामान्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करत स्वतःच्या पायावर उभे केले आहे,’ असे मत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी व्यक्त केले. ‘पतसंस्था व सहकारी बँकांनी निर्माण केलेल्या कल्याणकारी वित्तव्यवस्थेने सर्वसामान्यांची बेकायदा सावकारी शोषणातून मुक्तता केली आहे,’ असे कौतुकही त्यांनी केले.
पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थांचे सहकारी फेडरेशनची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा छत्रपती शिवाजीनगर येथील रमा रमण कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या वेळी जिल्ह्यातील आदर्श पतसंस्थांना स्वर्गीय आमदार शिवाजीराव भोसले आदर्श पतसंस्था पुरस्काराने गौरविण्यात आले. या प्रसंगी प्रा. डॉ. दुर्गाडे बोलत होते. फेडरेशनच्या अध्यक्षा रेश्मा भोसले सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. सहकार तज्ज्ञ काशिनाथ दंडवते , उपाध्यक्ष शामराव हुलावळे, सचिव संतोष भेगडे, माणिकराव झेंडे, जयवर्धन भोसले, विनायक तांबे आदी सर्व संचालक व्यासपीठावर उपस्थित होते.
‘समान उद्दिष्टाने पतसंस्थांना एकजूट करून त्यांच्या सर्वांगीण विकासाचा साकल्याने विचार फेडरेशन करत आहे,’ असे समाधान प्रा. डॉ. दुर्गाडे यांनी व्यक्त केले. ‘सहकारी पतसंस्थांनी गोरगरीब सभासदांना मालक करून आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकशाहीचा पाया रचला आहे. आता सहकारी पतसंस्थांनी आर्थिक शिस्त, कॉर्पोरेट कार्यसंस्कृती, नियमांच्या बंधनात काम करून, स्वतःच्या क्षमतांचा विस्तार केला पाहिजे,’ अशा सूचनाही त्यांनी केल्या.
रेश्मा भोसले म्हणाल्या, ‘पतसंस्था या सहकार चळवळीचा अविभाज्य घटक असून, सहकार संस्कृती जोपासण्याचे काम करणारे आपले फेडरेशन राज्यात आदर्श म्हणून ओळखले जात असल्याचा अभिमान आहे. सहकार हे ‘मी नव्हे आपण’ हे मूल्य रुजविणारी संस्कृती आहे. फेडरेशनचे संस्थापक दिवंगत आमदार शिवाजीराव भोसले यांनी हे मूल्य पेरले असून, ते जोपासण्याचे कार्य आपल्याला करायचे आहे. सहकार क्षेत्राला प्रभावी दिशादृष्टी देणाऱ्या आमदार शिवाजीराव भोसले यांच्या प्रयत्नांमुळेच सहकार कायद्यात कलम १०१ (थकबाकी वसुलीची कायदेशीर प्रक्रिया), कलम १५६ (थकबाकी वसुलीचे अधिकार) आणि नियम १०७ चा प्रभावी वापर सुरू झाला. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ फेडरेशनने पतसंस्थांना प्रोत्साहनासाठी आमदार शिवाजीराव भोसले आदर्श पतसंस्था पुरस्कार सुरू केला असून, त्यामुळे सहकार क्षेत्रात नवे मापदंड निर्माण झाले आहेत. प्रबोधन व प्रशिक्षण हा सहकाराचा आत्मा असून, फेडरेशनचे संस्थापक आमदार शिवाजीराव भोसले प्रशिक्षण केंद्रात कायदे, आर्थिक व्यवस्था, डिजिटल कौशल्य, सदस्य सेवा आणि नेतृत्व विकास या विषयावर दर्जेदार प्रशिक्षण दिले जाते. या उपक्रमामुळे फेडरेशनला राज्य शिखर संस्था म्हणून मान्यता मिळाली आहे. संस्थापकांचे स्वप्न पुढे नेण्याचे कार्य माजी आमदार अनिल भोसले यांनी केले असून, फेडरेशनचा प्रभाव संपूर्ण राज्यात पोहोचला आहे.’
काशिनाथ दंडवते म्हणाले, ‘पतसंस्थांच्या समस्या सोडवून त्यांना कामकाजात सर्वतोपरी मदत करण्याचे काम फेडरेशन करत आहे. स्पर्धात्मक युगात नवीन नियमावलीच्या अनुषंगाने प्रशिक्षण कार्यक्रम व थकीत कर्जवसुलीच्या कामकाजात सुधारणा आवश्यक असून, त्यासाठी पतसंस्थांना फेडरेशनची मदत घेता येईल.’
तत्पूर्वी, मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. शामराव हुलावळे यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले. ‘पतसंस्थांविषयक कामांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन करणाऱ्या फेडरेशनसोबत सर्व पंतसंस्थांचे ऋणानुबंध निर्माण झाले आहेत,’ असे ते म्हणाले. सभेच्या सुरुवातीला वार्षिक अहवाल व सभेच्या कार्यक्रम पत्रिकेचे वाचन केले. सभासदांनी फेडरेशनच्या कार्याचे व सर्व संचालक मंडळाच्या योगदानाचे कौतुक केले. यतीनकुमार फुले यांनी आभार मानले.
…
फेडरेशनचे स्वमालकीचे ‘वास्तू’स्वप्न पूर्ण
पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थांचे सहकारी फेडरेशनने अध्यक्षा रेश्मा भोसले यांच्या पुढाकारातून छत्रपती शिवाजीनगर परिसरात स्वमालकीची जागा खरेदी केली असून, तिथे लवकरच अत्याधुनिक सोयी-सुविधायुक्त प्रशस्त वास्तू उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा फेडरेशनचे संचालक विनायक तांबे यांनी केली. पतसंस्थांच्या मागणीनुसार फेडरेशनतर्फे थकीत कर्जवसुलीसाठी आकारण्यात येणारे सेवा शुल्क दोन टक्क्यांवरून दीड टक्के करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. सर्व सभासदांनी टाळ्यांच्या कडकडाटात या दोन्ही घोषणांचे स्वागत केले.
….
या पतसंस्थांना स्वर्गीय आमदार शिवाजीराव भोसले आदर्श पतसंस्था पुरस्कार
गट : ५ ते १५ कोटी रुपयांच्या ठेवी
प्रथम पुरस्कार : तुळजाभवानी नागरी सहकारी पतसंस्था, थेरगाव
द्वितीय पुरस्कार : भागीरथी नागरी सहकारी पतसंस्था मर्या, हडपसर
…
गट : ५ ते १५ कोटी रुपयांच्या ठेवी (ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था)
प्रथम पुरस्कार : श्री. शिवशक्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, पेठ, ता. आंबेगाव
द्वितीय पुरस्कार : साईप्रेरणा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, डिंगोरे, ता. जुन्नर
तृतीय पुरस्कार : अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, बोरी खुर्द, जुन्नर
…
गट : १५ ते ५० कोटी रुपयांच्या ठेवी (नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित)
प्रथम पुरस्कार विभागून : पंडित दीनदयाळ उपाध्याय नागरी सहकारी पंतसंस्था मर्यादित, शिवाजीनगर पुणे
आणि नगर नागरी सहकारी पतसंस्था मर्या, हडपसर पुणे
द्वितीय पुरस्कार विभागून : महादेवनगर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मांजरी बुद्रुक हवेली आणि संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, मंचर, ता. आंबेगाव
तृतीय पुरस्कार : रामचंद्रदादा कवडे पुण्यनगरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, घोरपडी, पुणे
…
गट : १५ ते ५० कोटी रुपयांच्या ठेवी (ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित)
प्रथम पुरस्कार : श्रीनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, थेऊरफाटा ता. हवेली
द्वितीय पुरस्कार : कल्पवृक्ष ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, भेकराईनगर, फुरसुंगी, पुणे
…
गट : ५० कोटी ते १०० कोटी ठेवी (नागरी सहकारी पतसंस्था)
प्रथम पुरस्कार : चाकण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, चाकण, ता. खेड
द्वितीय पुरस्कार : श्रमजीवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, काळेवाडी पुणे
तृतीय पुरस्कार : मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, तळेगाव दाभाडे
…
गट : ५० कोटी ते १०० कोटी रुपयांच्या ठेवी (ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था)
प्रथम पुरस्कार : श्रीकृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, वडगांव काशिंबेग, ता. आंबेगाव
…
गट : १०० कोटी व त्यापुढील ठेवी
प्रथम पुरस्कार : श्री. अंबिका ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, खोडद, ता. जुन्नर
द्वितीय पुरस्कार विभागून : श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, नारायणगाव, ता. जुन्नर
आणि वसंतराव नाईक नागरी सहकारी पतसंस्था, आळेफाटा
तृतीय पुरस्कार : भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, लांडेवाडी-चिंचोडी
….
गट : पगारदार नोकरांची सहकारी पतसंस्था
प्रथम पुरस्कार : पुणे जिल्हा परिषद सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे
द्वितीय पुरस्कार : सबॉर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन को-ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड, पुणे
तृतीय पुरस्कार : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे
…
गट : सहभाग पुरस्कार
ग्रामसेवा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, धनगरवाडी, ता. जुन्नर
हवेली तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित, नारायण पेठ पुणे
आधार नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कर्वेरोड पुणे
जयहनुमान ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, पिंपळी लिमटेक, ता. बारामती
सेवागिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, हिंजवडी पुणे
श्री. डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था, तळेगाव दाभाडे
संभाजी भुजबळ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, तळेगाव ढमढेरे



