अधिकारी व मांडववाल्यांचे साटेलोटे
पुण्यातील वारज्यातील माई मंगेशकर हॅास्पिटल ते आदित्य गार्डन रस्त्यावर उभारलेल्या बेकायदा फ्लेक्सवर आज महापालिकेने फक्त धूळफेक करणारी कारवाई केली.
या रस्त्यांच्या दुतर्फा उभारलेल्या बेकायदा फ्लेक्सवर कारवाई करताना एका स्थानिक नेत्याच्या भावाच्या वाढदिवसाच्या फ्लेक्सवर मात्र कारवाई करण्याची हिम्मत अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना झाली नाही.
वारज्यातील मारुती मंदिर ते आदित्य गार्डन या रस्त्याच्या कडेला महापालिकेने लॅान विकसित केले आहे. या लॅानवरच खड्डे घेऊन मोठे फ्लेक्स उभारण्यात आले होते. या खड्ड्यांमुळे लॅानचे अतोनात नुकसान झाले. या फ्लेक्सवर आज सकाळी महापालिकेने कारवाई सुरू केली. मात्र ही कारवाई दिखावू असल्याचे नागरिकांना दिसले. बेकायदा फ्लेक्स फाडून ते अतिक्रमण विभागाचा गाडीत टाकण्यात आले. पण हे फ्लेक्स उभारलेल्या लोखंडी फ्रेम मात्र मांडववाल्यांना परत देण्याची मेहेरनजर या अधिकाऱ्यांनी दाखवली असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

बेकायदा फ्लेक्स हटविण्याची कारवाई सरसकट करण्याची ग्वाही वारजे क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. प्रत्यक्षात एका स्थानिक नेत्याच्या भावाच्या वाढदिवसानिमित्त उभारलेल्या बेकायदा फ्लेक्सवर कारवाई करण्यास अधिकारी धजावले नाहीत.
या संदर्भात महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.



