पौराणिक, सामाजिक आणि राजकीय विषयांवर देखाव्यांची धमाल गणेशोत्सवाचा उत्साह पिंपरी-चिंचवड, भोसरी परिसरात शिगेला पोहोचला आहे. घरगुती गणपतींच्या विसर्जनानंतर सोमवारी शहरभरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उभे केलेले थरारक, जिवंत आणि हलते देखावे पाहण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी झाली. सामाजिक, धार्मिक आणि सद्यःस्थितीवर आधारित संदेश देणाऱ्या या देखाव्यांनी लोकांना अक्षरशः भुरळ घातली.
रात्री उशिरापर्यंत रस्त्यांवर गर्दी, देखावे बंद केल्यानंतरही उत्साह
गौरी आगमनानंतर रविवारी रात्रीपासूनच नागरिक बाहेर पडले होते. सोमवार हा गणेशोत्सवाचा सहावा दिवस असल्याने घराघरात गौरी पूजन आणि नैवेद्य दाखवल्यानंतर संध्याकाळपासून मंडळांनी देखावे उघडले. रात्री दहा वाजेपर्यंत चाललेल्या या सोहळ्यात लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांचीच पावले देखाव्याकडे वळली.
गर्दीमुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
पिंपरी, चिंचवड स्टेशन रोड, काळभोरनगर, भोसरी गावठाण, नेहरूनगर, निगडी, आकुर्डी, गांधी पेठ, चापेकर चौक, मोरया गोसावी मंदिर रस्ता आणि पिंपरी गावठाण परिसरात लोकांचा सागर उसळला होता. वाहतूककोंडी होऊ नये म्हणून पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवत मध्यवर्ती चौकात बॅरिकेड लावून काही रस्ते वाहनांसाठी बंद केले.
बस, रेल्वे आणि मेट्रोतही तुफान गर्दी
उत्सवाच्या काळात पीएमपी बसची फेऱ्या वाढवण्यात आल्या असून मध्यरात्री दोनपर्यंत वाहतूक सुरू ठेवण्यात आली. पुण्यातील देखावे पाहण्याचीही अनेकांची पसंती असल्याने मेट्रो आणि रेल्वेत मोठी गर्दी दिसली. तळेगाव, लोणावळा, कामशेत, देहूगाव आदी भागातूनही नागरिक पिंपरी-चिंचवडमध्ये देखावे पाहण्यासाठी दाखल झाले.



