केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या जवळच्या असलेल्या राज्यातील एका बड्या मंत्र्यांच्या निकटवर्तीय तसेच माजी सनदी अधिकाऱ्यांचा जवळच्या व्यक्तीसह तिघांविरोधात मंगळवारी सकाळपासून प्राप्तीकर विभागाचे छापे सुरू असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज्यातील मंत्री हा अमित शाह यांच्या जवळचा असल्यानेच हे छापेसत्र सुरू झाल्याची चर्चा आहे.

राज्यातील मंत्र्यांच्या जवळची असलेली व्यक्ती गेल्या अनेक वर्षांत मंत्रालयात ‘मध्यस्थ’ म्हणून काम पाहते. अनेक मंत्र्यांसाठी या मध्यस्थाने काम केले आहेत. राज्यातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्यांसह जमिनीशी संबंधित अनेक महत्वाच्या फाई्ल्स क्लिअर करण्यात या मध्यस्थाने काम पाहिले, काम पाहत आहे. अशा ‘पॉवरफूल’ आणि पाटीलकी करणाऱ्या व्यक्तीवर प्राप्तिकर विभागाचे छापे पडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अनेकांनी आपले ‘व्हॉटसअॅप’ क्लिअर करत जुने काही रेकॉर्ड तर प्राप्तिकर विभागाच्या हाती लागणार नाही ना, यासाठी धावपळ सुरू केली आहे.
अमित शाह यांच्या जवळीक साधण्यात येत असल्यानेच राज्यातील मंत्र्याशी संबंधितांवर छापासत्र सुरू झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. गेल्या दोन वर्षांत या मंत्र्यांच्या मतदारसंघात अमित शाह यांचे वाढते दौरे राज्यातील नेत्यांच्या डोळ्यात भरणारे होते. त्यामुळे या मंत्र्यांना कधी ना कधी ‘झटका’ बसणार, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होतीच. या पार्श्वभूमीवर हे पडलेले छापे चर्चेचा विषय ठरले आहेत. दरम्यान, माजी सनदी अधिकाऱ्याच्या संबंधित तो ‘मध्यस्थ’ही आहे. याशिवाय या सनदी अधिकाऱ्याच्या आणखी एका ‘पंटर’वरही छापे पडल्याने या ‘रेड’मध्ये तो माजी सनदी अधिकारीही रडारवर आहे का, अशीही दबक्या आवाजात चर्चा आहे.

