
एका दिवसात ५० हेक्टर मोजणी
पुणे- पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय छत्रपती संभाजी महाराज विमानतळाच्या जागेची मोजणी सुरू झाली असून पहिल्याच दिवशी ५० हेक्टर मोजणी पूर्ण करण्यात आली.
या विमानतळासाठी ९३ टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांनी संमतिपत्रे आली आहेत. त्याआधारे जिल्हा प्रशासनाने पुढील प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
पुरंदरमधील कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी, उदाचीवाडी आणि वनपुरी या सात गावांच्या जागेवर विमानतळ होणार आहे. यासाठी तीन हजार एकर जमीन संपादित करण्यात येणार आहे. संपादित जमिनीपोटी शेतकऱ्यांना दहा टक्के विकसित जागेचा मोबदला देण्यात येणार आहे.
संपादनपात्र तीन हजार जागेपैकी अखेरच्या दिवशी सुमारे ३ हजार २२० शेतकऱ्यांनी २ हजार ८१० एकर म्हणजे ९३ टक्क्यांहून अधिक संमतिपत्रे प्रशासनाकडे दाखल केली. त्यानंतर प्रशासनाने संपादित करण्यात येणाऱ्या जमिनींच्या मोजणीस प्रारंभ केला. मोजणीसाठी पाच पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांनी पहिल्या दिवशी मुंजवडी, खानवडी आणि एखतपूर या तीन गावातील ५० हेक्टरहून अधिक जमिनीची मोजणी केली. विमानतळासाठी अधिग्रहित होणारी सर्व जमीन पुढील १५ दिवसांत मोजण्यात येणार आहे, असेही डुडी यांनी सांगितले.



