पुणे शहराला हादरवून सोडणाऱ्या आयुष कोमकर खून प्रकरणात तपासाला मोठे वळण मिळाले आहे. गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशी नाना पेठ परिसरात झालेल्या टोळीयुद्धातून आयुष कोमकरचा खून झाला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी आंदेकर टोळीतील चौघांना गुजरात सीमेवरून अटक करण्यात आली असून त्यांना ट्रान्झिट रिमांडनंतर पुण्यातील विशेष ‘मकोका’ न्यायालयात हजर केले जाणार आहे. मात्र टोळीचा मुख्य म्होरक्या बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा आंदेकर अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
अटक आरोपी कोण?
या प्रकरणात अटक झालेल्यांमध्ये शिवम उदयकांत आंदेकर (३१), अभिषेक उदयकांत आंदेकर (२१), शिवराज उदयकांत आंदेकर (२९) आणि माजी नगरसेविका लक्ष्मी उदयकांत आंदेकर (६०, रा. नाना पेठ) यांचा समावेश आहे. सध्या १३ आरोपींविरोधात खुनासह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत गुन्हा दाखल आहे. त्यात बंडू आंदेकर (७०), त्याची मुलगी वृंदावनी वाडेकर, तिचे पुत्र, तसेच अन्य साथीदारांचा समावेश असून कृष्णा ऊर्फ कृष्णराज आंदेकर (४०) अद्याप फरारी आहे.
घटना कशी घडली?
५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास भवानी पेठेतील लक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये आयुष कोमकरवर गोळीबार करून त्याचा खून करण्यात आला. आयुष हा गणेश कोमकरचा मुलगा असून गणेश हा माजी नगरसेवक वनराज आंदेकर खूनप्रकरणातील आरोपी आहे. जुन्या वैमनस्यातून हा हल्ला घडल्याचे तपासात समोर आले आहे. आयुषची आई कल्याणी कोमकर हिने याबाबत समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.
पोलिसांचा कारवाईत कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त
गुन्हे शाखेने बंडू आंदेकर यांच्या घरावर टाकलेल्या झडतीत ७७ तोळे सोन्याचे दागिने, अडीच लाखांची रोकड, चांदी, मोटार, जमीन व बँकेची कागदपत्रे असा मोठा मुद्देमाल हाती आला. तसेच वृंदावनी वाडेकर आणि तिच्या मुलांच्या घरांतून २१ हजारांची रोकड, १६ मोबाईल फोन आणि दागिन्यांच्या पावत्या जप्त करण्यात आल्या. या कारवाईमुळे आंदेकर टोळीच्या आर्थिक सामर्थ्याचेही मोठे नेटवर्क समोर आले आहे.
पोलिसांची माहिती
गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांनी सांगितले की, आरोपींना गुजरातमधून ताब्यात घेऊन पुण्यात आणले आहे. त्यांना विशेष न्यायालयात हजर करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे. फरारी आरोपी कृष्णा आंदेकर याचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या पथकांना पाचारण करण्यात आले आहे.



