शहरात झपाट्याने वाढणाऱ्या काँक्रीटच्या जंगलात एखादे मोठे, जुने झाड पडले की त्याचे भविष्य तोडफोडीतच संपते. मात्र अंधेरी (पश्चिम) येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील मर्क्युरी अपार्टमेंटमध्ये पडलेल्या तब्बल ४० वर्षे जुन्या आंब्याच्या झाडाला स्थानिकांच्या सामूहिक प्रयत्नांतून नवजीवन मिळाले.
या मोहिमेचा पुढाकार पर्यावरणप्रेमी संजिव वल्सन यांनी घेतला. त्यांना वाघोबा हॅबिटॅट फाउंडेशनचे सहकार्य मिळाले तर तांत्रिक मार्गदर्शन हॉर्टिकल्चरिस्ट विनोद मोहिते यांनी केले. एवढेच नव्हे, तर केईएस श्रॉफ कॉलेज, कांदिवली येथील विद्यार्थी स्वयंसेवकांनी प्रत्यक्ष झाड उभारणीच्या प्रक्रियेत सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनाचा प्रत्यक्ष धडा घेतला.
झाड का पडले?
गेल्या काही दिवसांच्या पावसामुळे झाडाच्या मुळांची पकड कमी झाली होती. चुकीच्या छाटणीमुळे झाड एका बाजूला झुकले होते. काही रहिवाशांनी पालिकेकडे झाड धोकादायक असल्याची तक्रार केली होती. मात्र, तोडफोड न करता झाडाला वाचवण्याचा निर्णय घेतला गेला.
झाडाला जीवदान कसे दिले?
- मुळांना इजा होऊ नये म्हणून विशेष औषधांचा वापर करण्यात आला
- झाडाचे वजन कमी करण्यासाठी मर्यादित छाटणी केली गेली
- झाडाभोवती मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकण्यात आला
- हळूहळू झाडाला दोऱ्या, लोखंडी पाइप आणि पट्ट्यांचा आधार देऊन सरळ उभे केले गेले
- काही महिने या आधारावर झाड स्थिर राहील आणि नंतर ते पुन्हा मातीत घट्ट रुतून वाढेल
पावसामुळे झाड पडण्याची प्रमुख कारणे
- मुसळधार पावसामुळे माती सैल होणे
- मुळाखालची धूप
- काही झाडांच्या मुळांची खोली कमी असणे
- बांधकामे, खड्डे आणि जलवाहिन्यांमुळे झाडाभोवतीची माती हलकी होणे
उपक्रमाचे महत्त्व
बहुतेकवेळी पडलेले झाड लगेच तोडून टाकले जाते. परंतु योग्य काळजी आणि नियोजन केल्यास ते पुन्हा जिवंत राहू शकते. या मोहिमेत स्थानिक रहिवासी, पर्यावरण तज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे केलेले काम हे पर्यावरण संवर्धनासाठी आदर्श उदाहरण ठरले आहे.






