पिंपरी चिंचवडकरांनो, पुतळ्यांच्या सावलीत अडकून नका
– विकासाचा हिशेब मागा
पिंपरी चिंचवड शहरात राजकारणाचा केंद्रबिंदू विकास नसून धार्मिक अस्मिता, पुतळे आणि मोठे कार्यक्रम झाले आहेत. आमदार, खासदार, नगरसेवक आणि विविध पक्षांचे नेते नागरिकांना मूळ प्रश्न विसरायला लावून स्मारकांच्या आणि महोत्सवांच्या गदारोळात रमवतात. महापालिकेच्या पैशातून भव्य कार्यक्रम होत आहेत, स्वतःचे श्रेय घेण्यासाठी फलकबाजी, उद्घाटन सोहळे, जल्लोष सुरू आहे. मात्र, याच वेळी नागरिकांना दररोज मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे.
शहरातील लाखो नागरिकांना आजही दररोज पाणीपुरवठा मिळत नाही. काही भागात दोन दिवसांनी एकदा पाणी येते. रस्त्यांची अवस्था अशी की पावसाळ्यात खड्डे आणि उन्हाळ्यात धूळ याशिवाय काही दिसत नाही. महापालिकेच्या सांडपाणी प्रकल्पाचे नियोजन फसले आहे. रस्त्यांवर सांडपाणी साचून डासांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सार्वजनिक रुग्णालयांची अवस्था दयनीय आहे, शाळांमध्ये सुविधा अपुऱ्या आहेत. तरीसुद्धा महापालिकेचा शेकडो कोटी रुपयांचा निधी पुतळे उभारणे, कलाकारांचे कार्यक्रम, आणि नेत्यांच्या प्रसिद्धीवर खर्च होतो. याहून गंभीर बाब म्हणजे नागरिकांनीच या गदारोळाला मुकाट मान्यता दिली आहे. नेत्यांच्या वाढदिवसाला, उद्घाटन सोहळ्याला गर्दी करून, फोटो काढून, टाळ्या वाजवून लोक स्वतःच्या हक्कांपासून दूर गेले आहेत. पाणी नाही, रस्ते नाहीत, वाहतूक कोंडी सुटत नाही, पण नागरिक प्रश्न विचारत नाहीत. लोकशाहीत मतदार जागा असेल तरच नेते जबाबदार राहतात; अन्यथा ते स्वतःच्या फायद्यासाठीच राजकारण करतात, हे वास्तव पिंपरी चिंचवडने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.
आता वेळ आली आहे की शहरातील प्रत्येक नागरिकाने डोळे उघडावेत. नेत्यांना धार्मिक अस्मिता आणि स्मारकांच्या भूलथापांमध्ये अडकवून न ठेवता विकासाबाबत हिशोब मागावा. महापालिकेच्या प्रत्येक पैशाचा लेखा मागावा. नागरिकांनी पाणीपुरवठा, रस्त्यांची देखभाल, सांडपाणी व्यवस्था, रुग्णालये, शाळा याबाबत थेट प्रश्न विचारले तरच नेते बदलतील.
——-
विरोधी पक्ष नावालाच…
शहरात सध्या भाजपचे चार आमदार आहेत. महापालिकाही भाजपच्या ताब्यात होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) एक आमदार, शिंदे गटाचे एक खासदार आहेत. शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), मनसे यांची ताकद शहरात दिसून येत नाही. मोर्चे, आंदोलने, सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणे, असे काही होताना दिसत नाही. या उलट, अनेकदा विरोधी पक्षातील नेत्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या हातात हात घालून काम केल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.
———
नेत्यांना हे प्रश्न विचारा…
– पिंपरी चिंचवड मध्ये नागरिकांना दररोज पाणीपुरवठा केव्हां होणार
– दर्जेदार रस्ते केंव्हा निर्माण होणार
– महापालिकेतील टक्केवारी कधी बंद होणार
– कामत हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई केंव्हा होणार
– महापालिकेची कामे स्वतःच्या नावावर खपविण्याची पद्धत कधी थांबणार
– महापालिका कामकाज, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमधील राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप कधी थांबणार
– सांडपाणी व्यवस्था, आरोग्य व्यवस्था कधी सुधारणार
– गरिबांना हक्काची घरे कधी मिळणार
– महापालिका आणि नागरिकांमधील एजंटगिरी कधी बंद होणार
घ्या
——
शहरात छत्रपती संभाजी महाराज स्मारक, संविधान भवन, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाबाई स्मारक होत आहे, या गोष्टीचा मोठा अभिमान वाटतो आहे. मात्र, या स्मारकांचे काही राजकीय लोक राजकारणासाठी वापर करत आहेत. लोकांना धार्मिक अस्मितेत अडकवून मूलभूत प्रश्नापासून दूर लोटले जात आहे. शहरात आज पाणी, स्वच्छता, प्रदूषण, रस्ते, आरोग्य अशा असंख्य समस्या आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष व्हावे, राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातील हितसंबंधांवर कोणी बोट ठेवू नये, यासाठी जनतेला विविध समारंभ, मनोरंजनाच्या कार्यक्रमात अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. नागरिकांनी वेळीच सावध होऊन, राजकीय लोकांना विकासाबाबत प्रश्न विचारायला हवेत.
– मारुती भापकर, सामाजिक कार्यकर्ते
——–
शहरातील सर्रास सुरू असलेल्या अवैध वृक्षकत्तलीकडे कोणाचे लक्ष नाही. श्वानांच्या नसबंदी घोटाळ्यातून सहिसलामत सुटलेल्या पिसाळलेल्या कुत्र्यांवरती नावापुरती कारवाई करून लोकांना सतत कुत्र्यांच्या भीतीत ठेवले.
गेल्या आठ वर्षाच्या महापालिकेच्या ५६ हजार कोटी बजेटमधून आठ कामे सांगण्यासारखी झालेली नाहीत. पवना बंदिस्त पाईपलाईन तीनशे वरून पंधराशे कोटीवर गेली. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झाला.
रस्त्यांवर खड्ड्यांचे राज्य आहे. एकंदरीत महायुतीच्या अर्धा डझन लोकप्रतिनिधींचे नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष नाहीये आणि ते महापालिका लुटण्यात व्यस्त आहेत. यावर जनतेने प्रश्न विचारायला हवेत.
– माधव धवणे पाटील, मुख्य प्रवक्त, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)






