पुणे महापालिकेच्या प्रभागरचनेचे साटे लोटे ?

Author Picture
By onlyfor politics Published On: September 5, 2025

पुणे महापालिकेची प्रभागरचना करताना ती आपल्या मर्जीनुसारच व्हावी, यासाठी महायुतीतील तिन्ही घटकपक्षांनी जोरदार प्रयत्न केले. तसेच यासंदर्भात परस्पर सामंजस्य आणि साटेलोटे करीत सर्वच माननीय यांना सेफ करण्यासाठी पडद्यामागून हालचाली करण्यात आल्या.
भारतीय जनता पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार या तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून महापालिकेतील प्रभागरचनेसंदर्भात फिल्डिंग लावण्यात आली होती.

अदृश्य ‘महाशक्ती’ चा प्रभागरचनेवर असलेला वरदहस्त पाहता विरोधकांनी आक्रमक भूमिका घेऊन थेट राज्यपालांकडे तक्रार करण्याचा पवित्रा घेतला होता. या सर्व घडामोडींमुळे प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा तातडीने नगरविकास विभागाला सादर करण्याच्या हालचाली महापालिकेने सुरू केल्या आणि तो मंजूर देखील करण्यात आला!

पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा अंतिम टप्प्यात आला असताना त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप झाला आणि आराखडा अंतिम करण्यास विलंब झाला, असा आरोप करण्यात आला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) हे जेव्हा सत्तेवर होते तेव्हा त्यांनी आपल्या सोयीनुसार प्रभाग रचना करून घेतली होती, याची आठवण करून देत महायुतीच्या घटकांकडून हे सर्व आरोप फेटाळण्यात आले.

दरम्यान, महापालिकेच्या २०१७ च्या प्रभागरचनेच्या आसपासच या वेळची प्रभागरचना कायम ठेवण्याचा आग्रह धरण्यात आला. दुसरीकडे, महापालिका आयुक्तांनी सादर केलेल्या आराखड्यात आपल्या मर्जीप्रमाणे बदल केले नसल्याने नगरविकास विभागात बदल करण्यासाठी महायुतीतील स्थानिक नेत्यांकडून प्रयत्न सुरू करण्यात आले, अशीही चर्चा रंगली होती.

प्रभागरचनेतील या कथित हस्तक्षेपामुळे महापालिकेतील अधिकारी बेजार झाले होते. प्रभागरचनेत प्रत्यक्ष सहभागी असलेले अधिकारी लपूनछपून या रचनेचे काम करीत असून, कोणाच्या फारसे दृष्टीस पडणार नाही, याची काळजी घेत होते, अशीही चर्चा रंगली होती.

प्रभागरचनेच्या आराखड्यात विरोधकांना ‘धडा’ शिकविण्याचा प्रयत्न होत असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात करण्यात आली. काँग्रेस . प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा या वेळी पहिल्यांदाच नगरविकास विभागाला सादर करण्यात आला.

‘नगरविकास विभागाकडून हा आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर केला गेला. आता प्रत्यक्षात या आराखड्याचे प्रारूप जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या प्रेमळ संबंधांद्वारे साधलेला समन्वय आणि साटेलोटे हे हळूहळू प्रकाशात येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी Youtube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Discover more from Only For Politics

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading