अजित पवार आता थेट तुमच्या दारात! प्रत्येक नागरिकाची तक्रार ऐकणार उपमुख्यमंत्री

Author Picture
By onlyfor politics Published On: September 12, 2025

पुणे : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ने नागरिकांशी थेट संवाद साधण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘राष्ट्रवादी जनसुनावणी’ या मोहिमेची घोषणा केली असून, नागरिकांच्या अडचणी व तक्रारी थेट ऐकून घेण्याचे आश्वासन दिले आहे.

या उपक्रमाची सुरुवात १३ सप्टेंबरला हडपसरमधून होणार असून पुढे टप्प्याटप्प्याने पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील विविध शहरांमध्ये ती राबवली जाईल. या जनसुनावणीत येणाऱ्या तक्रारींचे विभागनिहाय वर्गीकरण होईल आणि प्रत्येक तक्रारीवर त्वरित कार्यवाहीसाठी स्वतंत्र फॉलोअप यंत्रणा तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अजित पवार स्वतः दर तीन दिवसांनी तक्रारींवरील प्रगतीची पाहणी करणार आहेत.

भाजपविरोधात तयारी

पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेत भाजपने अजित पवार गटाला विश्वासात न घेतल्याने राष्ट्रवादीचे अनेक माजी नगरसेवक व पदाधिकारी नाराज आहेत. त्यामुळेच अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना “पालिका निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी सज्ज व्हा” असा स्पष्ट संदेश दिला आहे. या पार्श्वभूमीवरच कार्यकर्त्यांना गती मिळावी आणि नागरिकांमध्ये संपर्क वाढावा, या उद्देशाने ही जनसुनावणी सुरू होत आहे.

तंत्रज्ञानाचा वापर

या मोहिमेत केवळ प्रत्यक्ष तक्रारी ऐकून घेण्यावर भर नसून किऑस्क प्रणाली व व्हॉट्सॲपद्वारेही नागरिकांना तक्रार नोंदवता येणार आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांपासून तरुणाईपर्यंत सर्वांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

अजित पवारांचा दौरा

जनसुनावणी मोहिमेनंतर अजित पवार १४ सप्टेंबर रोजी ‘राष्ट्रवादी परिवार स्नेह भेट दौऱ्या’ला सुरुवात करणार आहेत. हडपसर विधानसभा मतदारसंघातील तब्बल २० ठिकाणी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. या दौऱ्याचा समारोप कात्रज येथे होणार असल्याची माहिती आमदार चेतन तुपे यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी Youtube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Discover more from Only For Politics

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading