गल्ली ते दिल्लीपर्यंत संवाद प्रस्थापित केल्यानेच विक्रमी यश
बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशाचे श्रेय भारतीय जनता पक्षाचे बिहार प्रभारी विनोद तावडे यांनी सर्वस्वी बिहारच्या जनतेला दिले आहे. जातीपातीच्या राजकारणापेक्षा बिहारच्या जनतेने विकासाच्या बाजूने कौल दिला, असे तावडे यांनी आवर्जून सांगितले. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर भारतीय जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखवला हेही बिहार निवडणुकीतून सिद्ध झाले.
भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील सरकारमध्ये मंत्रिपद भूषवलेल्या विनोद तावडे यांची राष्ट्रीय स्तरावर सरचिटणीस पदावर काही वर्षांपूर्वी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर हरियाणातील विधानसभा निवडणुकीत भाजपने यश मिळवले. आता तावडे यांच्याच प्रभारी पदाच्या कारकिर्दीत भाजपने बिहारमध्ये विक्रमी यश मिळवले आहे.
त्यासंदर्भात संवाद साधताना तावडे म्हणाले की, विरोधकांच्या कोणत्याही आरोपांमागे फरपट होऊ न देता आम्ही विकासाचा मुद्दा कायम अग्रस्थानी ठेवला. बिहार अब रफ्तार पकड चुका है, म्हणजेच बिहारमध्ये विकासाची सुरू झालेली धाव आता कोणीही थांबू शकत नाही, असा आशावाद व्यक्त करून भाजपने प्रचार केला.
भारतीय जनता पक्ष कालांतराने आपल्या मित्र पक्षांना संपवून टाकतो आणि सत्ता हस्तगत करतो. बिहारमध्ये नितीश कुमार आणि जनता दल युनायटेड यांची देखील भाजप तीच गत करणार, अशा आशयाचे आरोप केले जात होते. परंतु, वस्तुस्थिती तशी नव्हती. गल्ली ते दिल्लीपासून भारतीय जनता पक्षप्रणित एनडीएमधील सर्व घटकांमध्ये संवाद साधण्यावर मी भर दिला. त्यामुळेच निवडणुकीत हानी होईल, अशा पद्धतीची कोणतीही कटकारस्थाने झाली नाहीत. चिराग पासवान यांच्या माध्यमातून नवीन नेतृत्व देखील बिहारमध्ये तितक्याच जोमाने विकसित झाले. आपल्याला सर्वच्या सर्व २४३ जागांवर विजय मिळवायचा आहे याच भावनेने एनडीएमधील कार्यकर्ते काम करीत होते. तसेच, राष्ट्रीय, राज्य स्तरावरील नेतेमंडळी आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये कोणताही विसंवाद नव्हता. त्यामुळेच, बंडखोरी, क्रॉस वोटिंग अशा पद्धतीचा कोणताही दगा फटका सोसावा लागला नाही.
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या पक्षाभोवती मोठे वलय निर्माण झाले होते. परंतु, भारतीय जनता पक्षाने त्यांना अतिशय मुत्सद्देगिरीने हाताळले. प्रशांत किशोर यांच्या कोणत्याही आरोपाला आम्ही बळी पडलो नाही. तसेच, प्रशांत किशोर यांना अवाजवी महत्त्व देत त्यांनी सेट केलेल्या फेक नॅरेटीवला उत्तर देण्याच्या फंदात पडलो नाही, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.
भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता या नात्याने राष्ट्रीय स्तरावर काम करीत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळण्याची संधी मिळते. पक्ष देईल ती जबाबदारी निष्ठेने सांभाळणे हे आम्ही आमचे कर्तव्य मानतो. भविष्यात देखील पक्ष देईल ती जबाबदारी सर्वतोपरीने यशस्वी करण्यासाठी मी तत्पर राहील, अशा शब्दात विनोद तावडे यांनी महाराष्ट्रातील राजकारणामध्ये परत येणार का या प्रश्नावर उत्तर दिले.





