मुंबई महापालिका रणांगण तापलं; मनसेच्या ९० जागांच्या मागणीने उद्धवसेना गोंधळली!

Author Picture
By onlyfor politics Published On: September 12, 2025

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात सर्वांचे लक्ष आता ठाकरे बंधूंकडे लागले आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची गेल्या दोन महिन्यांत झालेली सलग चार भेटी, त्यातही मागील दोन आठवड्यांत दोनदा झालेला संवाद, या घडामोडींनी दोन्ही भावांच्या नात्याला नवी उभारी मिळाल्याचं दिसून येतंय. एकेकाळी वैयक्तिक मतभेदांमुळे दुरावलेले ठाकरे बंधू आता पुन्हा जवळ येताना दिसत असल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) युतीच्या चर्चेला अधिक गती मिळाली आहे.

मुंबई महापालिकेची निवडणूक या समीकरणाचा केंद्रबिंदू मानली जात आहे. उद्धव ठाकरे यांना महापालिकेवर वर्चस्व कायम ठेवायचं असल्यास मनसेची साथ अत्यंत महत्त्वाची मानली जाते. युती झाली तर शिवसेना उबाठाला नवसंजीवनी मिळू शकेल, असा पक्षांतर्गत अंदाज आहे. दुसरीकडे, राज ठाकरे यांची मनसे मागील काही निवडणुकांपासून अस्तित्व टिकवण्यात अपयशी ठरत आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाचा खातेही न उघडल्याने कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरली आहे. त्यामुळे युती झाल्यास मनसेलाही ताकद मिळू शकेल, अशी आशा व्यक्त केली जाते.

परंतु सध्या सर्वात मोठा पेच जागावाटपात आहे. मनसेने मुंबई महापालिकेतील ९० ते ९५ जागांवर दावा ठोकल्याचं वृत्त समोर आलं आहे. २२७ प्रभाग असलेल्या महापालिकेत मनसेला मागील निवडणुकीत फक्त ७ जागांवर विजय मिळाला होता. अशा परिस्थितीत एवढ्या मोठ्या संख्येने जागांची मागणी करणं शिवसेना उबाठातील अनेक वरिष्ठ नेत्यांना अवास्तव वाटतंय. विशेष म्हणजे, मराठी मतदारसंख्या जास्त असलेल्या विभागांमध्ये दोन्ही पक्षांची ताकद जवळपास सारखीच असल्याने तिथे जागावाटपाचं कोडं अधिक गुंतागुंतीचं ठरू शकतं.

२०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेने ८४ जागा जिंकून सत्ता काबीज केली होती. त्या वेळी मनसेला केवळ ७ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. मात्र गेल्या काही वर्षांत दोन्ही पक्षांची स्थिती बदलली आहे. शिवसेना उबाठा फोडाफोडीतून कमजोर झाली, तर मनसेलाही संघटन टिकवण्यात अपयश आलं. तरीसुद्धा गेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत शिवसेना उबाठाला २३.२% तर मनसेला १४% मते मिळाली होती. त्यामुळे मनसेकडे ठराविक मतदारसंघात अजूनही ‘कोर वोटबँक’ असल्याचं स्पष्ट होतं.

राज ठाकरे अधूनमधून महायुतीशी संपर्कात राहतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंसोबत युती करायची की नाही, याबाबत त्यांनी अंतिम निर्णय जाहीर केलेला नाही. या पार्श्वभूमीवर उद्धव आणि राज ठाकरे युती करतील का, की चर्चेनंतर हा प्रयोग अर्धवटच राहील, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी Youtube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Discover more from Only For Politics

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading