पुणे शहराचा गणेशोत्सव देशभरात प्रसिद्ध आहे. दरवर्षी लाखो गणेशभक्त शहरातील मानाच्या तसेच नामांकित मंडळांचे देखावे पाहण्यासाठी गर्दी करतात. या वाढत्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पुणे पोलिसांनी यंदाही मोठे बदल केले आहेत.
शहरातील १६ प्रमुख रस्ते सायंकाळी ५ नंतर वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. त्याचबरोबर १२ रस्त्यांवर जड वाहनांना पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार असून नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
याशिवाय, पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) तब्बल ६६ बस मार्गांमध्ये बदल करण्यात आला आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पुणे मेट्रोनेही जादा फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
कोणते रस्ते राहणार बंद?
सायंकाळी ५ नंतर बंद होणारे मार्ग :
लक्ष्मी रोड (हमजेखान चौक ते टिळक चौक)
शिवाजी रोड (गाडगीळ पुतळा चौक ते मंडई परिसर)
बाजीराव रोड (पुरम चौक ते आप्पा बळवंत चौक)
टिळक रोड (हिराबाग चौक ते नेहरू स्टेडियम)
सुभेदार तालीम चौक, पानघंटी चौक, गंज पेठ चौक, सेंट्रल स्ट्रीट, जेधे प्रसाद रस्ता इत्यादी
जड वाहनांवर बंदी असलेले रस्ते :
शास्त्री रोड, टिळक रोड, कुमठेकर रोड, लक्ष्मी रोड, केळकर रोड, बाजीराव रोड, शिवाजी रोड, कर्वे रोड, एफसी रोड, जंगली महाराज रोड, सिंहगड रोड, गणेश रोड
नो-पार्किंग झोन घोषित
गणेशोत्सवात पार्किंगमुळे अडथळे होऊ नयेत म्हणून खालील रस्ते नो-पार्किंग झोन घोषित करण्यात आले आहेत :
शिवाजी रोड : जिजामाता चौक ते मंडई चौक
लक्ष्मी रोड : मुंबई चौक ते शनिपार चौक
बाजीराव रोड : शनिपार चौक ते फुलकाबुरुज
आप्पा बळवंत चौक ते बुधवार पेठ
यामुळे वाहतूक व्यवस्थित पार पाडली जाईल, मात्र नागरिकांनी वाहतुकीच्या या बदलांबाबत सतर्क राहूनच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




