आशिया कपमधील सर्वात हायव्होल्टेज सामना १४ सप्टेंबरला खेळवला जाणार आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. पण यावेळी वातावरण नेहमीसारखं तापलेलं नाही. उलट, प्रेक्षकांचा प्रतिसाद थंड पडल्याचं चित्र दिसतंय.
पहलगाम येथील क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवलं होतं. त्यानंतर पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना होणार असल्याने या सामन्याला अफाट मागणी असेल, अशी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात तिकीट विक्री मात्र ठप्प झाली आहे.
११ सप्टेंबरच्या अखेरपर्यंत या सामन्याची ५० टक्क्यांहून अधिक तिकीटे विकलीच गेलेली नाहीत. म्हणजेच भारत-पाकिस्तान सामन्याला बहिष्काराचा फटका बसल्याचं दिसतं. दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याला एवढी थंड प्रतिक्रिया मिळणं हे अभूतपूर्व मानलं जात आहे. कारण याच स्टेडियमवर झालेल्या २०२३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्याची तिकिटे अवघ्या चार मिनिटांत संपली होती.
तिकिटांच्या किंमती ९९ अमेरिकन डॉलर (सुमारे ८,७४२ रुपये) पासून ते प्रीमियम श्रेणीतील ४,५३४ डॉलर (सुमारे ४ लाख रुपये) इतक्या आहेत. विक्रीला सुरुवात २९ ऑगस्टला झाली होती. आज १५ दिवस उलटूनही अर्ध्याहून अधिक तिकिटे विकली गेली नाहीत, ही बाब आयोजकांसाठी चिंतेची ठरत आहे.
यामागे सर्वात मोठं कारण म्हणजे भारतीय चाहत्यांकडून व्यक्त होत असलेला बहिष्कार. ऑपरेशन सिंदूरनंतर अनेक खेळाडूंसह चाहत्यांनी भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध सामना खेळू नये, अशी भूमिका घेतली होती. मात्र बीसीसीआयने सरकारच्या भूमिकेनुसार निर्णय घेतला आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सामना खेळण्यास मान्यता दिली. तरीसुद्धा चाहत्यांनी या सामन्याकडे फारसं लक्ष दिलेलं नाही.
भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर अशी वेळ पहिल्यांदाच आली आहे. लाखो रुपये खर्च करून तिकिटं विकत घेणारे प्रेक्षकच दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे सामना रंगणार की स्टेडियम अर्धं रिकामं राहणार, हा प्रश्न सध्या क्रिकेटविश्वात चर्चेत आहे.







