काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकार आणि भाजपवर तीव्र निशाणा साधला आहे. बिहारमध्ये सुरू झालेल्या त्यांच्या ‘मतदार अधिकार यात्रा’चा सोमवारी पाटण्यात समारोप झाला. या यात्रेला त्यांनी ॲटम बॉम्ब संबोधत, पुढे आता हायड्रोजन बॉम्ब फुटणार, असा धमाकेदार इशारा दिला.
राहुल गांधी म्हणाले की, “ज्यांनी महात्मा गांधींची हत्या केली, तेच आज संविधानाच्या हत्येचा कट रचत आहेत. लवकरच रेशन कार्ड आणि शेतकऱ्यांची जमीनही काढून घेतली जाईल आणि ती उद्योगपतींच्या ताब्यात जाईल.”
मतदार यादीतील दावे अजूनही करता येणार
बिहारमधील विशेष पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान मतदार यादीवरील दावे, आक्षेप आणि दुरुस्त्या १ सप्टेंबरनंतरही दाखल करता येतील. मात्र, अंतिम मतदार यादी तयार झाल्यानंतरच त्यांचा विचार केला जाणार असल्याची माहिती आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे.
नितीश कुमार भाजपच्या पिंजऱ्यात : खरगे
या सभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही थेट मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, “नितीश सध्या भाजप आणि संघाच्या झोळीत आहेत. पण वेळ आल्यावर हेच लोक त्यांना कचऱ्यात फेकून देतील.”
“राहुल गांधींचा बॉम्ब फुसका” – भाजप
दरम्यान, भाजपने राहुल गांधींच्या विधानावर पलटवार केला आहे. माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की, “राहुल गांधींचा ॲटम बॉम्ब आधीच फुसका ठरला आहे. आता तो हायड्रोजन बॉम्ब फोडणार म्हणतोय, ही तर मतदारांचा अपमान करण्यासारखी गोष्ट आहे.”







