क्रिकेटच्या निमित्ताने शिवाजी पार्क येथे चर्चा नाराजीच्या बॅटिंगची! 

Author Picture
By Office Onlyforpolitics Published On: September 22, 2025

मुंबईतील शिवाजी पार्क जिमखाना नूतनीकरण कार्यक्रमाला आशिष शेलार यांच्या अनुपस्थितीचा नो बॉल!

मॅच भी जितो और दिल भी… असा संदेश देत तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी बऱ्याच कालावधीनंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर जात असलेल्या भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या होत्या. क्रिकेट, किंवा एकूणच खेळ हे सर्व भेदभाव दूर करून सौहार्दपूर्ण वातावरण तयार करणारे एक महत्त्वाचे साधन असते. सध्या मात्र या क्रिकेटच्या निमित्ताने राजकीय नाराजी नाट्य पाहण्यास मिळत आहे. आणि त्याच्याच चर्चेची बॅटिंग सोमवारी मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क येथे पाहण्यास मिळाली.

विशेषत: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मंत्री आशिष शेलार यांच्या दोस्तीची पूर्वीपासून चर्चा आहे; मात्र, राज व उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याच्या हालचाली सुरू असताना राज यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाकडे शेलार यांनी पाठ फिरवली आहे. विशेषत: शेलार हे क्रिकेट संघटनांचे पदाधिकारी असूनही या क्रिकेटविषयक कार्यक्रमाला त्यांचा ‘नो बॉल पडला,’ अशी चर्चा सुरू आहे.

निमित्त होते शिवाजी पार्क जिमखानाच्या नूतन वास्तूच्या उद्घाटनाचे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्तिगत लक्ष घालून हे नूतनीकरण पूर्ण केले आहे. मास्टर ब्लास्टर, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते आज नूतन वास्तू आणि सुविधांचे उद्घाटन करण्यात आले.

भारतीय जनता पक्षाचे नुकतेच उचलबांगडी करण्यात आलेले मुंबई अध्यक्ष, राज्याचे सांस्कृतिक मंत्री आणि मुंबई क्रिकेटमध्ये दीर्घकाळ कार्यरत असलेले आशिष शेलार हे देखील या प्रकल्पाशी जवळून निगडित आहेत. उद्घाटन समारंभाचे निमंत्रण त्यांना देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष उद्घाटन प्रसंगी आशिष शेलार यांची अनुपस्थिती होती. अनेकांनी ती बोलून देखील दाखवली.

त्याचे झाले असे की, राज ठाकरे यांचे गेल्या काही महिन्यांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याशी पुन्हा सुरू जुळले आहेत. तसेच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासमवेत युती करण्याचे संकेत देखील राज ठाकरे यांनी दिले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या या निर्णयामुळे भारतीय जनता पक्ष आणि मनसे यांच्यामध्ये पक्ष आणि व्यक्तिगत स्तरावर काहीसा ताण आल्याचे पाहण्यास मिळते आहे. आणि त्यामधूनच आशिष शेलार यांनी, राज ठाकरे यांच्याबरोबर असलेले व्यक्तिगत संबंध आता संपले, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी केले होते. त्यामुळेच की काय शिवाजी पार्क आणि क्रिकेट या अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या विषयासंदर्भात कार्यक्रम होऊन देखील केवळ राज ठाकरे यांचा पुढाकार आणि उपस्थिती यामुळे आशिष शेलार यांनी नाराजीची बॅटिंग केली असावी अशी जोरदार चर्चा शिवाजी पार्कच्या राजकीय पिचवर रंगली होती!

या समारंभाला आशिष शेलार यांच्या अनुपस्थितीबाबत कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण उपलब्ध झाले नाही.

दरम्यान शिवाजी पार्क जिमखाना नूतनीकरण अत्यंत आकर्षक पद्धतीने करण्यात आले आहे. विम्बल्डनच्या क्लब हाऊस प्रमाणे त्याची रचना करण्यात आली असून सर्व अध्यायावत क्रीडा सुविधा त्या ठिकाणी विकसित करण्यात आले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलींसाठी स्वतंत्र ड्रेसिंग रूम उभारण्यात आली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने यासंदर्भात समाधान व्यक्त केले. महिला क्रिकेट आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप उल्लेखनीय कामगिरी करत आहे. त्यामुळे त्याला स्थानिक पातळीवर देखील प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. ड्रेसिंग रूम सह महिला मुलींसाठी स्वतंत्र सुविधा विकसित केल्यास महिलांच्या खेळांना आणि सहभागाला मोठी चालना मिळेल असा विश्वास सचिनने यावेळी व्यक्त केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी Youtube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Discover more from Only For Politics

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading