पुणे शहरातील चार बडे नेते भाजपच्या गळाला लागणार

Author Picture
By Office Onlyforpolitics Published On: September 22, 2025

विरोधी पक्षांबरोबरच मित्र पक्षातील नेतेदेखील गळाला लावण्यासाठी प्रयत्न!

पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत कोथरूड विधानसभा मतदार संघात शत प्रतिशत भाजप यश मिळवून देण्यासाठी भाजपातील नेत्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. पुढील वर्षी निवडणुका होणार असल्या तरी त्यादृष्टीने आतापासूनच शहरातील काही नेत्यांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी मित्र पक्षाबरोबरच विरोधी पक्षातील विजयाची खात्री असलेल्या नगरसेवकांना टार्गेट करून त्यांना आपल्या पक्षात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

त्यासंदर्भात अशीच एक बैठक नुकतीच झाली. या बैठकीत मित्र आणि विरोधी पक्षातील चार नेते भाजपच्या गळाला लागले असल्याचे चर्चा राजकीय वर्तुळात जोरदारपणे सुरू आहेत. तसेच नव्या प्रभाग रचनेत तयार झालेल्या शिवणे-खडकवासला प्रभागातील राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) एका मोठ्या नेत्याबाबतही चर्चा झाल्याचे कळते.

भाजपने मुंबईनंतर पुण्यावर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांपासून ते पक्षाचे अनेक मंत्री वारंवार कार्यक्रमांच्या निमित्ताने पुण्याच्या दौऱ्यावर येत असतात. नेत्यांच्या या दौऱ्याची संधी साधत शहरातील नेतेही मतदार हवा तसा फायदा करून घेतात. त्यासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठका घेणे, गाठीभेटी घेणे आदी गोष्टी उरकल्या जात आहेत. गेल्या आठवड्यात माजी प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी अशीच एक बैठक झाली. आपल्या मतदार संघातील मनसे, राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) शिवसेना (ठाकरे गट) आणि कॉंग्रेसचे एका ज्येष्ठ नगरसेवकांना पक्षात प्रवेशासंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. त्यासाठी मुंबई येथे प्रवेशाचा कार्यक्रम देखील ठरल्याचे बोलले जात आहे. या चारही ज्येष्ठ नगरसेवकांनी त्यास होकार दिला असल्याचे समजते.

त्यापैकी तीन नगरसेवक हे कोथरूड विधानसभा मतदार संघातील आहे. तर एक नगरसेवक हे पर्वती विधानसभा मतदार संघातील आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशाने कोथरूड विधानसभा मतदार संघ जवळपास विरोधी पक्ष मुक्त होण्याची शक्यता अधिक बोलून दाखविली जात आहे. तर पर्वती मध्येही काहीशी तशीच परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यांच्या प्रवेशाने आमदारांची आणि पक्षाची ताकद वाढणार असली, तरी निष्ठावंतांवर मात्र अन्याय होणार आहे. त्यामुळे येत्या काळात निष्ठावान काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी Youtube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Discover more from Only For Politics

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading