पाकिस्तानला वेगळं पाडण्यासाठी भारताचं नवं शस्त्र – सौदीसोबतचं संरक्षण सहकार्य

Author Picture
By onlyfor politics Published On: August 30, 2025

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पाक समर्थित दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांचा नायनाट केला आणि जगासमोर पाकिस्तानचा खरा चेहरा उघडा पाडला. यानंतर आता भारताने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पाकिस्तानचा प्रभाव कमी करण्यासाठी भारताने सौदी अरबला मोठी संरक्षण ऑफर दिली आहे.

२८ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत झालेल्या भारत–सौदी अरब संयुक्त संरक्षण सहकार्य समितीच्या सातव्या बैठकीत ही ऑफर अधिकृतपणे मांडण्यात आली. या बैठकीचे सह-अध्यक्ष भारताच्या वतीने परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव अमिताभ प्रसाद तर सौदी अरबच्या वतीने स्टाफ मेजर जनरल साद मोहम्मद एच अलकाथिरी होते.

भारताची सौदीला ऑफर

बैठकीत दोन्ही देशांनी संरक्षण सहकार्य अधिक बळकट करण्यावर भर दिला. त्यात भारताने सौदी सैन्यदलांना प्रशिक्षण देण्याची ऑफर दिली. यासोबतच सायबर सुरक्षा, माहिती तंत्रज्ञान, आपत्ती व्यवस्थापन आणि धोरणात्मक संचार सहकार्य या क्षेत्रांत भागीदारी करण्याबाबत चर्चा झाली. गेल्या अनेक दशकांपासून सौदी सैन्यदलांना पाकिस्तान प्रशिक्षण देत आला आहे. पाकिस्तानी सैन्याने सौदी अरबमध्ये अनेक संयुक्त सराव आणि प्रशिक्षण मोहिमा राबवल्या आहेत. १९८२ ते १९८७ या काळात पवित्र स्थळांच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानने सौदीत मोहिम पार पाडली होती. तसेच २०१८ मध्ये प्रशिक्षण व सल्लागार मोहिमेद्वारेही सहकार्य केले होते. म्हणजेच सौदी आणि पाकिस्तान यांच्यात ऐतिहासिक व घनिष्ठ लष्करी संबंध आहेत. परंतु आता भारताने पुढाकार घेत सौदीसोबत नवे सहकार्य प्रस्थापित करण्याची तयारी दाखवली आहे.

औद्योगिक व संरक्षण भागीदारीची नवी दारे

बैठकीत भारताने आपल्या संरक्षण उत्पादन क्षेत्रातील प्रगती दाखवून दिली. भारतीय तज्ज्ञांनी अत्याधुनिक शस्त्रास्त्रं आणि संरक्षण उपकरणांची क्षमता सौदीसमोर मांडली. याशिवाय भारत आणि सौदीने संयुक्त उत्पादन, औद्योगिक भागीदारी आणि भविष्यातील लष्करी तंत्रज्ञानावरही चर्चा केली. या वर्षी भारत–सौदी दरम्यान नौदल आणि स्थलसेना चर्चाही यशस्वीरित्या पार पडल्या आहेत. त्यामुळे दोन्ही देशातील संरक्षण सहकार्य सातत्याने मजबूत होत असल्याचे स्पष्ट झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एप्रिल २०२५ मधील सौदी भेटीत या सहकार्याला अधिक गती मिळाली होती. त्या वेळीच संरक्षण सहकार्यावरील मंत्रीस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला होता.

पाकिस्तानवर दबाव वाढवण्याची भारताची रणनीती

सौदी अरबला संरक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भागीदार बनवून भारत पाकिस्तानचा पारंपरिक प्रभाव कमी करण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तान अनेक वर्षे सौदीला प्रशिक्षण आणि मदत देत आला आहे. परंतु आता भारताने सौदीला दिलेली ऑफर ही पाकिस्तानसाठी मोठा राजनैतिक धक्का ठरू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी Youtube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Discover more from Only For Politics

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading