ईशान्य भारतातील निसर्गरम्य मणिपूर राज्याने गेल्या काही वर्षांत गंभीर हिंसाचार आणि जातीय संघर्ष अनुभवले आहेत. या घटनांनी लोकांच्या जीवनावर खोल परिणाम केला असून अनेक कुटुंबं बेघर झाली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शनिवार, १३ सप्टेंबर) मणिपूर दौऱ्यावर आले. त्यांनी जनतेशी संवाद साधताना “भारत सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे,” असा विश्वास दिला.
मोदी यांनी जाहीर केलं की, मणिपूरमध्ये ७ हजार नवीन घरे उभारली जाणार असून विस्थापितांसाठी ५०० कोटी रुपयांचा निधी दिला जाईल. याशिवाय राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी तब्बल ३ लाख कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती त्यांनी सभेत दिली.
विकास आणि शांततेचा संदेश
चुराचांदपूर येथे मोदींनी विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी केली आणि जनसभेत भाषण केले. त्यांनी नमूद केलं की, “मणिपूरसारख्या सीमावर्ती राज्यात चांगली कनेक्टिव्हिटी ही नेहमीच एक मोठं आव्हान राहिलं आहे. आम्ही गेल्या काही वर्षांत रेल्वे मार्ग मोठ्या प्रमाणात वाढवले, गावोगावी रस्त्यांचं जाळं विणलं. विकासाची बीजे रुजवायची असतील तर शांतता आवश्यक आहे. म्हणूनच केंद्र सरकारने विविध गटांशी करार करत शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले.”
मोदींच्या भाषणादरम्यान त्यांनी सांगितले की, डोंगर-दऱ्यांतील अनेक गटांसोबत करार करून संघर्ष मिटवण्यात यश आलं आहे. मागील ११ वर्षांत ईशान्य भारताने हिंसाचाराऐवजी विकासाचा मार्ग निवडला आहे.
पायाभूत सुविधा आणि जीवनमान सुधारणा
चुराचांदपूरमध्ये नव्या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन करण्यात आलं. आतापर्यंत राज्यात ६० हजार घरे उभारली गेली असून त्यामुळे हजारो कुटुंबांना सुरक्षित आणि सन्मानजनक निवास मिळाला आहे.
मोदींनी सांगितलं की, “७-८ वर्षांपूर्वी मणिपूरमध्ये केवळ २५-३० हजार घरांमध्येच नळाद्वारे पाणीपुरवठा होत होता. पण आज, ३.५ लाखांहून अधिक घरांमध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी उपलब्ध आहे. ही बदललेली परिस्थिती म्हणजे केंद्र सरकारच्या विकासकामांचं ठोस उदाहरण आहे.”
विरोधकांचा निषेध आणि कडेकोट सुरक्षा
मोदींच्या दौऱ्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सभास्थळाजवळ निदर्शने केली. त्यामुळे परिसरात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आलं होतं. तथापि, मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या नागरिकांशी संवाद साधत मोदींनी मणिपूरच्या भविष्याबद्दल आत्मविश्वास व्यक्त केला.




