स्वदेशी बचत उत्सव पर्व जाहीर करीत मोदींनी वापरले ‘ट्रम्प कार्ड’!

Author Picture
By Office Onlyforpolitics Published On: September 21, 2025

जीएसटी मधील कपातीमुळे सर्वसामान्यांसाठी दसरा दिवाळी खरेदीची पर्वणी

बाजारपेठेला उठाव मिळण्याची व्यापाऱ्यांना आशा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भरमसाठ ट्रेड टेरिफ आणि एच १ बी व्हिसासाठी लाखो रुपये मोजण्याच्या तरतुदींचा बॉम्ब टाकल्यानंतर भारतीय बाजारपेठ आणि मध्यमवर्ग यामध्ये काहीशी नकारात्मकता पसरली होती. ती दूर करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवीन जीएसटी तरतुदींच्या पार्श्वभूमीवर स्वदेशी बचत उत्सव पर्वाची घोषणा केली. त्यामुळेच, उद्यापासून सुरू होत असलेली नवरात्र आणि त्यानंतरच्या दसरा, दिवाळी शॉपिंग फेस्टिवलसाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर उत्साह येईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

जीएसटी हा केवळ अर्थकारणाचा भाग राहिला नसून त्यावर मोठे राजकीय वादळ निर्माण झाले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जीएसटीवर गब्बरसिंग टॅक्स अशी सातत्याने टीका केली होती. त्याचप्रमाणे वाढती महागाई आणि बेरोजगारी अशा परिस्थितीत भारतामधील सर्वसामान्य मध्यमवर्गीय कष्टकरी जनतेला मोदी सरकारकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही, अशी टीका देखील विरोधकांकडून करण्यात येत होती.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात नवीन जीएसटी आकारणीचे सूतोवाच केले होते. त्यापाठोपाठ अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नवीन जीएसटी तरतुदींची घोषणा केली. आता केवळ पाच आणि अठरा टक्के या दोनच जीएसटी आकारणीच्या स्लॅब राहणार आहेत. तसेच दैनंदिन वापरातील बहुतांश वस्तूंवरील कर १० ते २५ टक्क्यांनी कमी झाला आहे. पूर्वीच्या १२ टक्के स्लॅब मधील ९९ टक्के वस्तू या आता पाच टक्के स्लॅब मध्ये आणल्या आहेत. तर आरोग्य विमा आता जीएसटी मुक्त करण्यात आला आहे.

परिणामी, दैनंदिन वापरातील उत्पादनांपासून इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, मोबाईल, दुचाकी चारचाकी वाहने, अशा जवळपास सर्वच ग्राहक उपयोगी वस्तूंच्या किमतीत कपात होणार असल्याचे स्पष्ट झाले. जीएसटी कपातीचा थेट फायदा ग्राहकांना मिळावा यासाठी देखील अर्थ खात्याकडून प्रयत्न करण्यात आले.

दरम्यानच्या काळात ट्रम्प यांनी पुकारलेल्या ट्रेड वॉर आणि व्हिसा बॉम्ब यामुळे बाजारपेठेचे खच्चीकरण झाले. आणि सणासुदीच्या तोंडावर पसरलेल्या या नैराश्याला दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडून ट्रम्प कार्ड, म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशाला उद्देशून आवाहनाचे माध्यम आज वापरण्यात आले.

वास्तविक, पंतप्रधान मोदी यांनी आज देशाला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये कोणताही नवीन मुद्दा नव्हता. जीएसटी कपातीची घोषणा देखील यापूर्वीच करण्यात आली होती. फक्त त्याला खास मोदींच्या शैलीत राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाचे आणि स्वदेशीच्या आवाहनाचे व्यापक परिमाण देण्यात आले. त्याची प्रभावी अंमलबजावणी करून देशांतर्गत बाजारपेठेमध्ये नवचैतन्य आणण्यासाठी भारतीय जनता पक्ष आता देशव्यापी मोहीम राबवणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी Youtube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Discover more from Only For Politics

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading