गरबा दांडिया फक्त हिंदूंसाठीच -विश्व हिंदू परिषद
आधार तपासूनच गरबा दांडियाला प्रवेश देण्याची विश्व हिंदू परिषदेची मागणी
दोन्ही शिवसेनांचा मराठी दांडिया ठरणार लक्षवेधी!
गणेशोत्सवानंतर उभ्या महाराष्ट्राला आता नवरात्रोत्सवाचे वेध लागले असून गरबा दांडियाच्या आयोजनासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मुंबईतील मराठी अमराठी वाद आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या स्पर्धेमुळे नवरात्रोत्सवामध्ये राजकीय ताल देखील टिपेला पोहोचणार आहे!
त्यातच नवरात्र उत्सवातील दांडिया गरबा हा फक्त हिंदूंसाठीच असल्याचा दावा करून आधार कार्ड तपासून त्यासाठी प्रवेश देण्यात यावा अशी मागणी, विश्व हिंदू परिषदेने केली आहे. त्यामुळे गरबा दांडिया संयोजकांपासून पोलिसांपुढेही डोकेदुखी उभी राहण्याची शक्यता आहे.
मुंबईत पश्चिम उपनगरांमधील गुजराती समाजाच्या गरबा दांडियाला टक्कर देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मराठी दांडियाचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेत आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने देखील फेर धरला आहे! इतकेच नव्हे तर मराठी दांडियातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्याना दररोज एक आयफोन भेट देण्याची योजना देखील आखली जात आहे!
धार्मिक सण आणि उत्सव हे लोकांच्या एकत्र येण्याचे सर्वांत मोठे निमित्त आहे. त्यामुळेच या उत्सवांमध्ये राजकारणी मंडळी आघाडीवर असतात. मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे असे नेते गणेशोत्सवात अनेकांच्या घरी भेटी देऊन गणेशाचे दर्शन-आरती करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी गणेशोत्सवात दिलेली भेटही देशभरात चर्चेचा विषय ठरली होती. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील अशा अनेक नेत्यांनी पुण्यातही मानाच्या गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या.
पुण्यात गणेशोत्सवाला जो मान; तेच मुंबईकरांच्या दृष्टीने नवरात्र उत्सवाचे स्थान.. मुंबईतील गुजरातीबहुल भागांमध्ये वर्षानुवर्षे रास दांडियाच्या कार्यक्रमांचे आयोजन राजकीय पक्षांकडून करण्यात येते. पूर्वी पुण्यातही हा ट्रेंड आला होता.
राजकारण्यांप्रमाणेच डॉन मंडळींकडूनही अशा उत्सवांमध्ये कार्यक्रमांच्या आयोजनासाठी पुढाकार घेतल्याची उदाहरणे आहेत. अरूण गवळी च्या पुढाकाराने दगडी चाळीत अनेक वर्षे नवरात्र उत्सव आयोजित करण्यात येतो. त्याप्रमाणे छोटा राजनचा चेंबूर टिळकनगर येथील गणेशोत्सवही चर्चेत होता.
यंदा तर महापालिकांच्या निवडणुका येत्या जानेवारी अखेरपर्यंत होऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांतील इच्छुकही नवरात्र उत्सवात हिरिरीने उतरले आहेत. पुण्यात माजी नगरसेवक आबा बागूल हे अनेक वर्षे सहकारनगर भागात पुणे नवरात्र उत्सवाचे आयोजन करतात.




