बीडमध्ये पावसाचा कहर! हेलिकॉप्टर उतरले, धरणांचे पाणी गावाकडे धावले!

Author Picture
By onlyfor politics Published On: September 15, 2025

बीड जिल्ह्यात पावसाने अक्षरशः थैमान घातले असून आष्टी तालुक्यातील अनेक महसूल मंडळांमध्ये ढगफुटीसदृष्य परिस्थिती निर्माण झाली. दौलावडगाव, धामणगाव, धानोरा परिसरात मुसळधार पावसामुळे सर्व प्रकल्प आणि नद्या तुडुंब भरून वाहत आहेत.

कडा येथे सापते कुटुंबातील अकरा जण तसेच शेरिखुर्द येथील काही नागरिक पूरपाण्यात अडकले होते. या धोकादायक परिस्थितीत प्रशासनाला नाशिक येथील राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाची मदत घ्यावी लागली. हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बचावकार्य राबवून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या संपूर्ण ऑपरेशनवर आमदार सुरेश धस स्वतः लक्ष ठेवून होते.

दरम्यान, अंबाजोगाई तालुक्यातील राक्षसवाडी साठवण तलाव फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बोधेगाव, कावळेवाडी, वाघाळा, भिलेगाव, मलनाथपूर, परचुंडी, सेलू, पिंपळगाव, कौडगाव साबळा, कौडगाव अशा अनेक गावांतील नद्या ओसंडून वाहत आहेत. सोनपेठ–घोडा कवडगावमार्गे परळीला जाणारा पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक काही काळ ठप्प राहिली. गोदावरी नदीला पूर आल्याने परळी तालुक्यातील पोहनेर गावचा संपर्क पूर्णपणे तुटला.

माजलगाव तालुक्यात देखील पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेष म्हणजे, माजलगाव धरण क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणातून ५६ हजार क्यूसेकहून अधिक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणातून १७,३३३ क्यूसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. यामुळे सिंदफणा आणि मांजरा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने उच्च सतर्कतेचा इशारा दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी Youtube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Discover more from Only For Politics

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading