आपल्यापैकी अनेकांना रात्री झोपण्याआधी काहीतरी करण्याची सवय असते. कुणाला दात घासल्याशिवाय झोप येत नाही, कुणाला अंघोळ करूनच झोपायला आवडते, तर कुणी फक्त चेहरा धुवून शांत झोप घेतो. परंतु एक साधी आणि सोपी सवय अशी आहे, जी अनेक आजार टाळू शकते आणि तुमची झोप अधिक गाढ करू शकते. ती म्हणजे – झोपण्यापूर्वी पाय धुणे.
ही सवय फक्त स्वच्छतेशी संबंधित नसून आरोग्य आणि जीवनशैलीशी देखील निगडित आहे. दिवसभर थकलेल्या शरीराला रात्री आराम मिळावा यासाठी ही सवय खूप उपयुक्त ठरते. चला जाणून घेऊया, झोपण्यापूर्वी हात-पाय धुतल्याने नेमके कोणते फायदे होतात. झोपण्यापूर्वी हातपाय धुतल्यामुळे सर्दी, खोकला, फ्लू यांसारख्या संसर्गजन्य आजारांपासून बचाव करता येतो. दिवसभर धूळ-माती आणि बॅक्टेरिया हातापायावर साचलेले असतात. झोपण्यापूर्वी ते स्वच्छ केल्यास जंतू नष्ट होतात आणि संसर्गाचा धोका कमी होतो.
नियमित हातपाय धुण्याची सवय ठेवल्यास खाज, ऍलर्जी, एक्झिमा यांसारख्या त्वचेच्या समस्या कमी होतात. धुळीत आणि घाणीतून निर्माण होणारे बॅक्टेरिया त्वचेला हानी पोहोचवतात. पाय स्वच्छ धुतल्याने ऍलर्जी टाळता येते आणि त्वचा निरोगी राहते. रात्री थोडे कोमट पाणी घेऊन पाय धुतले किंवा पाय काही वेळ त्या पाण्यात ठेवले तर शरीरातील ताण कमी होतो. पायातील वेदना कमी होतात आणि मन शांत होते. त्यामुळे गाढ झोप लागते, झोपेची गुणवत्ता सुधारते आणि मानसिक तणावही दूर होतो.
झोपण्यापूर्वी हातपाय धुतल्याने शरीरावरील धूळ-मळ निघून जाते. त्यामुळे केवळ स्वच्छतेचा फायदा होत नाही तर शरीर निरोगी राहते. झोपण्याआधी सुमारे १५ मिनिटे आधी हातपाय धुतले तर अधिक चांगला परिणाम जाणवतो. हातपाय धुण्याची योग्य पद्धतही महत्त्वाची आहे. हलक्या साबणाने किंवा बॉडीवॉशने हातपाय घासून धुवावेत. नंतर नीट पाण्याने स्वच्छ करावेत आणि कोरड्या टॉवेलने पुसून घ्यावेत. शक्य असल्यास कोमट पाण्याचा वापर करावा.




