अजितदादांच्या जनसंवादमध्ये सहा हजार तक्रारी म्हणजे प्रशासनाचे अपयश नाही का ?

Author Picture
By Office Onlyforpolitics Published On: September 27, 2025

पालकमंत्र्यांच्या अधिकार क्षेत्रातील कारभारावर प्रश्नचिन्ह

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये जनसंवाद हा कार्यक्रम राबवत नागरिकांकडून थेट तक्रारी जाणून घेतल्या. या कार्यक्रमांमध्ये सहा हजार तक्रारी आल्याचे आणि त्याचा निपटारा केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस कडून सांगण्यात आले.

मात्र एकाच दिवसात ६ हजार तक्रारी येत आहेत याचा अर्थ हे प्रशासनाचे अपयश नाही का असा सवाल देखील आता उपस्थित होते.

महापालिका स्तरावर सध्या गेल्या सात वर्षांपासून प्रशासकीय राज सुरू आहे. तर पाच वर्षे भाजपकडे सत्ता होती. प्रशासकीय राजवटीत पालकमंत्री म्हणून अजित पवार आणि राज्य शासन यांचा वरचष्मा असतानाही नागरिकांचे एवढ्या तक्रारी येत असल्याने यातूनच प्रशासनाचा विस्कळीत कारभार समोर येत आहे.

जनसंवाद कार्यक्रमानंतर अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरात दिवसभर दौरा केला. अगदी गल्लीबोळात फिरून कार्यकर्त्यांच्या घरी जात संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहरातील सर्व नेते झाडून या दौऱ्यामध्ये सहभागी झाले होते.

पिंपरी चिंचवड मध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. मात्र अजित पवार हे पिंपरी चिंचवड बरोबर राज्यात कायमच सत्तेत राहिले आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांकडे सहा हजार तक्रारी शहरातून एकाच दिवशी येत आहेत याचा अर्थ महानगरपालिका पुणे महानगर विकास प्राधिकरण, पोलीस प्रशासन यांचे कामकाज आलबेल सुरू आहे का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

महानगरपालिकेचे येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये सत्ता काबीज करण्यासाठी अजित पवारांनी हा दौरा केल्याचे बोलले जाते. अजित पवारांचा दौरा होताच ज्येष्ठ नेते शरद पवार हे देखील शहरात दाखल झाले. शहरातील एका हॉटेलमध्ये पवार यांनी शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. यामध्ये आगामी निवडणुकीच्या माध्यमातून शहरातील सत्ता पुन्हा काबीज करण्याबाबत चर्चा झाल्याचे ही सांगितले जाते. दुसऱ्या दिवशी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी देखील स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

दुसरीकडे,  शहरातील भाजपाने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपचे शहरातील स्थानिक पदाधिकारी आणि आमदार आता उघडपणे स्वबळाचा नारा देऊ लागले आहेत. राज्यातील महायुती टिकेल न टिकेल पण स्थानिक पातळीवर सत्ता आपल्याकडेच राहावी यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये अंतर्गत धुसफूस आत्ता सुरू झाल्याचे दिसत आहे. दुसरीकडे महायुतीतील शिवसेना (एकनाथ शिंदे गट) म्हणावा तेवढा ॲक्टिव्ह नसल्याचे जाणवत आहे.

राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या बरोबरीनेच स्थानिक सर्व नेते शहरात फिरताना दिसतात. तर शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी केवळ विरोधी पक्षाला ट्रोलिंग करण्यामध्येच व्यस्त आहेत. शरदचंद्र पवार गटाकडे स्थानिक पातळीवर नेते नाहीत. कार्यकर्त्यांची फळी असल्याचे ते सांगत आहेत.

गेल्या काही वर्षांत पिंपरी चिंचवड शहराची झालेली वाताहत पाहता पिंपरी चिंचवडकरांना पुन्हा एकदा अजित पवारांची गरज भासल्याचे चित्र नुकतेच पाहायला मिळाले. ज्या शहरात भाजपचे चार आमदार आहेत, गेली पाच वर्षे महापालिका ताब्यात आहेत, अशा पक्षावर विश्वास न ठेवता आपलाच दादाच बरा गड्यांनो, या विचाराने तब्बल सहा हजार शहरवासीयांनी आपल्या लहान मोठ्या तक्रारी थेट अजित दादा पवारांकडे केल्या आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत शहरवासीय देवा भाऊवर विश्वास ठेवणार की त्यांचाच मित्र पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित दादांकडे सत्ता देणार, यावर जिल्ह्याचे पुढील राजकीय मार्गक्रमण होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी Youtube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Discover more from Only For Politics

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading