पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारी थैमान! टोळक्याचा कोयत्याने हल्ला, मोबाईल-दुचाकी लंपास

Author Picture
By onlyfor politics Published On: September 13, 2025

पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारी प्रकारांचा सिलसिला सुरूच आहे. पैशांवरून झालेल्या हल्ल्यापासून ते गांजाविक्री, पूर्ववैमनस्यातून मारहाण आणि अपघातापर्यंत अनेक घटना समोर आल्या आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या सर्व घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पैसे न दिल्याने कोयत्याने हल्ला, मोबाईल व दुचाकी लंपास

निगडी परिसरात १० सप्टेंबर रोजी दुपारी अंकुश चौक, ओटा स्कीम येथे धक्कादायक प्रकार घडला. १७ वर्षीय मुलाने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर टोळक्याने त्याच्यावर लोखंडी फायटर व कोयत्याने हल्ला केला. आरोपींनी फिर्यादी व त्याच्या मित्राला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, शिवीगाळ केली आणि नंतर त्यांचे मोबाईल व दुचाकी लंपास केली. चोरी गेलेला मुद्देमाल सुमारे १ लाख १४ हजार रुपयांचा आहे. या प्रकरणी सोहेल संतोष जाधव (२०) याला अटक करण्यात आली असून त्याच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल आहे. पोलिस तपास करत आहेत.

गांजा विक्रीत तरुण अटक

११ सप्टेंबर रोजी अजंठानगर, चिंचवड येथे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून विशाल मातीबर गौतम (२१) या तरुणाला अटक केली. त्याच्याकडून २०६ ग्रॅम गांजा (किंमत ₹१०,३००) जप्त करण्यात आला. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार तो गांजा विक्रीसाठी आला होता. सापळा रचून पोलिसांनी त्याला पकडले.

जुन्या वादातून दगडफेक व मारहाण

पिंपरी गावात पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादात एका तरुणावर हल्ला करण्यात आला. आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली तसेच कपाळावर दगड मारून जखमी केले. घराच्या खिडक्यांवर दगडफेक करून काचांचे नुकसान केले. या प्रकरणी गुन्हा दाखल असून तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

अपघातात वृद्ध जखमी, चालक फरार

१ सप्टेंबर रोजी देहुरोड येथे पायी चालत जाणाऱ्या विजय इरन्ना नायडू (६०) यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. धडकेत त्यांचा पाय व हात फ्रॅक्चर झाला तसेच चेहऱ्यावरही गंभीर जखमा झाल्या. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला. नायडू यांनी उपचार घेतल्यानंतर ११ सप्टेंबर रोजी पोलिसांत तक्रार नोंदवली. देहुरोड पोलीस चालकाचा शोध घेत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी Youtube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Discover more from Only For Politics

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading