इंद्रायणी नदीपात्रात युवकाला फेकलं; पिंपरी-चिंचवड हादरलं!

Author Picture
By onlyfor politics Published On: September 15, 2025

पिंपरी-चिंचवड परिसरात गुन्हेगारी घटनांचा वाढता कल पुन्हा एकदा समोर आला आहे. मद्यपानानंतर झालेल्या वादातून एका तरुणाला पुलावरून थेट नदीपात्रात फेकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना कुरूळी गावाजवळील जुन्या इंद्रायणी नदीच्या पुलावर घडली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोशीतील सिद्धार्थ भानुदास बोडके (३७) यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी पोलिसांनी मोहन तुकाराम जाधव (३४, मोशी) याला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने फिर्यादीला मद्यपानासाठी बोलावले होते. दोघांमध्ये वाद सुरू झाल्यानंतर परिस्थिती भांडणात बदलली. आरोपीने आधी मारहाण करत गाडीतून लोखंडी गज काढून हल्ला केला. त्यानंतर संतापाच्या भरात त्याने फिर्यादीला उचलून थेट पुलावरून नदीपात्रात फेकून दिले. सुदैवाने जीव वाचला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

तळेगाव दाभाडेत वाहतूक पोलिसांशी हुज्जत; दोघे युवक ताब्यात

वाहतूक नियंत्रणाच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी दोघा तरुणांना अटक केली आहे. सोमाटणे फाटा–शिरगाव रोडवर ही घटना घडली. पोलिस कर्मचारी प्रशांत खेडकर यांच्या फिर्यादीवरून ओंकार अविनाश क्षिरसागर (२९) आणि शुभम सावळेराम गावडे (२९) यांना ताब्यात घेण्यात आले.

वाहतूक सुरळीत सुरू असताना आरोपी ओंकार याने दुचाकी अडवून पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली. “तुम्हाला ट्रॅफिक काढता येत नाही का? मी तुमचा व्हिडिओ काढून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवतो” असे म्हणत त्याने धमकी दिली. एवढेच नव्हे, तर हवालदार बळीराम चव्हाण यांच्यासोबत धक्काबुक्कीही केली. दुसरा आरोपी शुभम याने देखील पोलिसांना दमदाटी केली. तळेगाव दाभाडे पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

रुग्णालयाबाहेरून मोबाईल हिसकावला; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

मोबाईल चोरीचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीत. वायसीएमएच रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ मोबाईल हिसकावल्याची घटना नुकतीच घडली. विशाल सुनील गायकवाड (२७, चिखली) यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर तुषार सुभाष कांबळे (२४, निगडी) याला अटक करण्यात आली आहे.

फिर्यादी विशाल हे त्यांच्या बहिणीसाठी जेवण घेऊन रुग्णालयाबाहेर परत येत होते. ते मोबाईलवर बोलत असतानाच आरोपीने अचानक त्यांच्या हातातून मोबाईल हिसकावला आणि पसार झाला. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला गजाआड केले. पुढील तपास सुरू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी Youtube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Discover more from Only For Politics

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading