वारकऱ्यांचा जीव धोक्यात! देहू-झेंडेमळा रस्त्यावर तब्बल 200 खड्डे; प्रशासनावर संतप्त नागरिक

Author Picture
By onlyfor politics Published On: September 11, 2025

पुणे जिल्ह्यातील देहू-आळंदी राज्य मार्ग वारकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, आषाढी वारी, कार्तिकी यात्रा आणि बीज सोहळा या सर्व धार्मिक यात्रांसाठी लाखो भाविक दरवर्षी या मार्गावरून पायी प्रवास करतात. शिवाय महिन्याला हजारो भाविक केवळ दर्शनासाठी या मार्गावरून प्रवास करतात. परंतु भाविकांच्या या आस्थेच्या रस्त्याची सध्या अत्यंत दुरवस्था झाली आहे.

रस्त्यावर 200 हून अधिक खड्डे

देहूरोड ते झेंडेमळा या अवघ्या ३ किमीच्या भागात तब्बल 200 पेक्षा अधिक खड्डे पडले आहेत. पावसाळ्यामुळे या खड्ड्यांचे प्रमाण व खोली वाढली असून वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका आणि वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. तळवडे आयटी पार्क तसेच चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रात जाणाऱ्या हजारो कामगारांनाही या रस्त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि वारकरी यांच्यात तीव्र नाराजी आहे.

ग्रामस्थांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

या मार्गाचे डांबरीकरण, खडीकरण आणि संरक्षक पट्ट्यांची तातडीने दुरुस्ती व्हावी, यासाठी देहू पंचक्रोशी कृती समितीच्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकाऱ्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेला प्रस्ताव पाठवण्याचे आश्वासन दिले आहे. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने आधीच ना-हरकत प्रमाणपत्र दिले असून, प्रशासनाकडून लवकरच दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

कार्तिकी वारीपूर्वी काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या कार्तिकी वारीत लाखो भाविक या रस्त्याचा वापर करणार असल्याने त्यापूर्वीच काम पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. जर काम विलंबित झाले तर आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रती सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा नियोजन अधिकारी, देहू कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेला देण्यात आल्या आहेत.

वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि पुणे-मुंबई महामार्गाशी जोडणाऱ्या या महत्त्वाच्या पालखी मार्गाच्या दुरुस्तीची सर्व प्रक्रिया आता वेगाने होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र हे काम कार्तिकी वारीपूर्वी पूर्ण होते की पुन्हा भाविकांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी Youtube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Discover more from Only For Politics

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading