पिंपरी राजकारणात खळबळ! महापालिका निवडणूक युतीवर की स्वबळावर? आरक्षण सोडतीवर अनेकांचे भवितव्य टांगणीला

Author Picture
By onlyfor politics Published On: September 3, 2025

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीची प्रारूप प्रभागरचना जाहीर झाल्यापासून शहरातील राजकारण तापलं आहे. महापालिका निवडणूक महायुती-आघाडीने होणार की प्रत्येक पक्ष स्वबळावर उतरणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यातच प्रभाग आरक्षणाच्या सोडतीवर इच्छुकांचे राजकीय भवितव्य अडकणार की सुटणार, याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. २२ ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या ३२ चारसदस्यीय प्रभाग रचनेनंतर निवडणूक लवकरच रंगणार हे स्पष्ट झाले आहे. भाजपकडे सर्वाधिक माजी नगरसेवक आणि इच्छुक असल्याने पक्ष स्थानिक पातळीवर स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. याला पक्षश्रेष्ठींचाही हिरवा कंदील मिळाल्याची चर्चा आहे. त्यामुळे २०१७ प्रमाणेच यंदाही भाजप स्वतंत्र लढेल, असे संकेत आहेत.

दरम्यान, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसदेखील महापालिकेत आपली ताकद परत मिळवण्यासाठी स्वबळाचा नारा देत आहे. हातातून निसटलेली सत्ता पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपच्या जागांवर डोळा ठेवून आरपीआयही आक्रमकतेने पुढे सरसावली आहे.
युती झाली नाही तर मतविभाजनाचा फटका मोठ्या उमेदवारांना बसू शकतो, अशी शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत. प्रत्येक प्रभागात इच्छुकांची मोठी संख्या असल्याने मतदारांना चुरशीच्या लढती पाहायला मिळणार हे निश्चित. महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, शरद पवार गट आणि आप यांच्या आघाडीसंदर्भात मात्र स्थानिक नेत्यांची भूमिका स्पष्ट नाही. आम आदमी पार्टीने आधीच स्वबळाचा नारा दिला आहे, तर मनसेची भूमिका अद्याप गूढच आहे.

महापालिकेतील एकूण १२८ जागांपैकी तब्बल ९३ जागा आरक्षित असणार आहेत. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या सोडतीनंतर कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण लागू होईल, याकडे इच्छुकांची सर्वाधिक नजर आहे. आरक्षण महिलांसाठी लागल्यास उमेदवारांच्या कुटुंबातील महिला सदस्यांना पुढे आणण्याची तयारीही सुरू आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद शहरात मर्यादित असली तरी महायुतीत भाग घेतल्यास त्यांना मोठा फायदा होऊ शकतो, अशी समीकरणे रंगू लागली आहेत. दरम्यान, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची (आठवले गट) सर्व मदार भाजपवर असल्याचे दिसत आहे.

महापालिकेच्या या निवडणुकीत युती-आघाडी होणार की स्वबळावर झुंजणार?
आरक्षणात कोणाला प्रभाग सुटणार आणि कोण अडकणार?
या प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत पिंपरी-चिंचवडचे राजकारण अक्षरशः पेटणार आहे!

महत्वपूर्ण बातम्यांसाठी Youtube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Discover more from Only For Politics

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading