पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये अधूनमधून कोसळणाऱ्या पावसामुळे वातावरण सतत बदलत आहे. सकाळी गारवा, दुपारी प्रखर उन्हं आणि रात्रीचा गारठा या हवामानातील चढ-उतारांमुळे नागरिक आजारी पडत आहेत. सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, अंगदुखी अशी लक्षणे दिसून येत असून शहरातील रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. शहरात सुरु असलेली मेट्रो, बीआरटीसह इतर विकासकामे आणि रस्त्यांचे खोदकाम यामुळे धुळीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यात हवामानातील वारंवार बदल याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून श्वसनविकार व संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
अनेक रुग्णांमध्ये कोरडा खोकला, घशात खवखव, सर्दी, ताप अशी लक्षणे दिसत आहेत. हवेत पसरणाऱ्या संसर्गामुळे आजारी पडणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी हलगर्जीपणा न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक असल्याचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर (महापालिका रुग्णालय, आकुर्डी) यांनी सांगितले.
हवामान + धूळकण = आजारांची वाढती लाट!
रुग्णालयांत वाढली गर्दी, डॉक्टरांचा इशारा – विलंब नको!






