पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर बदल्या झाल्या आहेत. अभियांत्रिकी विभागातील दोन अधिकारी आणि लेखा विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा यात समावेश आहे. या बदल्यांमुळे अतिक्रमण, अभियांत्रिकी, अग्निशमन आणि विकास परवानगी विभागातील कामकाजावर परिणाम होणार असल्याची चर्चा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कार्यकारी अभियंता संदीप खलाटे आणि संजय पाटील यांची पदोन्नतीसह बदली करण्यात आली आहे. तर, लेखा विभागातील वरिष्ठ अधिकारी बसवेश्वर पाटील यांची देखील अन्य विभागात बदली झाली आहे. आधीच अनेक विभाग प्रमुखांची पदे रिक्त असताना या नव्या बदल्यांमुळे प्रशासनात अधिकारीटंचाई गंभीर स्वरूपात दिसून येत आहे.
पीएमआरडीएच्या अभियांत्रिकी विभागात मुख्य अधिकारी 1 आणि 2 ही जबाबदारी एका व्यक्तीकडे आहे. विकास परवानगी विभागातील दोन अधिकारी सेवानिवृत्तीनंतर ती पदे आजवर भरली गेलेली नाहीत. अतिक्रमण विभागात केवळ दोनच अधिकारी असून, जमीन व मालमत्ता विभागातील तहसीलदार यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी आहे.
दरम्यान, पीएमआरडीएकडून उभारण्यात आलेल्या गृहप्रकल्पांबाबतच्या तक्रारी आणि पाहणीसाठी स्वतंत्र अधिकारी आवश्यक असतानाही वारंवार बदल्यांमुळे कार्यक्षमता कमी होत असल्याचे मान्य केले जात आहे. याआधीही राजू ठाणगे यांची बदली झाल्यानंतर त्या पदावर अधिकारी नियुक्त होण्यास विलंब झाला होता. आता संजय पाटील यांचीही बदली झाल्याने नागरिकांच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
पीएमआरडीएमध्ये सुरू असलेली ही अधिकार्यांची रेटाफेरी कधी थांबणार? नागरिकांच्या अडचणी कधी सोडवणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.






